पाकिस्तानी खेळाडू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. त्यांची विधानं अन् त्यांनी सहकारी खेळाडूंवर केलेली टीका क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधत असते. आता पाकिस्तानी खेळाडूचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ लाहोरच्या रस्त्यावर पावसात त्याच्या कारमध्ये स्टंट करताना दिसला. यानंतर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो रस्त्यावर फिरताना दिसत आहे. पाण्याने भरलेल्या रस्त्यावर तो आपली कार भरधाव वेगाने चालवतो, ज्यामुळे गाडीच्या शेजारी चालणाऱ्या लोकांवर घाण पाणी उडते.
पाकिस्तानी खेळाडूला त्याच्या कृत्यावरून ट्रोल केले जात आहे. याशिवाय स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून एका मंत्र्याची ही वागणुक पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. खरं तर वहाब रियाझ हा पाकिस्तानातील पंजाबचा क्रीडा मंत्री आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस पडत असून देशातील बहुतांश भाग पुराच्या तडाख्यात आहे. अशातच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा हा स्टंट स्थानिकांच्या अडचणी वाढवत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वहाबने ट्विटच्या माध्यमातून माफी मागितली. "नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात, पण दुर्दैवाने आपण नेहमी चुकीची बाजू पाहत असतो. माझ्याकड़ून जे घडले त्याबद्दल मी दिलगीर आहे, ते पूर्णपणे अनावधानाने झाले. याचा चुकीचा समज पसरवला गेला. त्यामुळे सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करूया आणि नकारात्मक प्रचाराने देशाला बदनाम करू नका", अशा शब्दांत वहाब रियाझने माफी मागितली.