ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं यजमानपद मिळाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला 'अच्छे दिन' आले आहेत. पण एका बाजूला यजमान संघावर ओढावलेल्या नामुष्की आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधील अससुरक्षिततेची भावना या गोष्टीमुळे पाकिस्तान पुन्हा चर्चेत येताना दिसतेय. गत चॅम्पियन असल्यामुळे यजमानपदाचा मान मिळालेल्या पाकिस्तानमध्ये खेळणं सुरक्षित वाटत नाही, असे सांगत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. परिणामी या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात येत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकमध्ये परदेशी पाहुण्यांचे अपहरण करण्याचं कट कारस्थान
दुबईचं मैदान गाजवत भारतीय संघानं पाकला जवळपास स्पर्धेबाहेर काढलं आहे. या गोष्टीमुळे पाकची नाचक्की होत असताना आता चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या कट कारस्थानाचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण करण्याचा कट काही संघटनांनी रचल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून हाय अलर्ट जारी सीएनएन-न्यूज १८ च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने सोमवारी हाय अलर्ट जारी केला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण करण्यासाठी सक्रिय गुप्त गट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर विभागानं याप्रकरणात स्पर्धेतील सुरक्षेसाठी तैणात असलेल्या सर्व दलांना सावधानतेचा इशारा दिलाय. याप्रकरणात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), आयसीस आणि बलुचिस्तानमधील इतर गटांसह अनेक दहशतवादी संघटनांविरुद्ध अलर्ट जारी करण्यात आला आहे, असा उल्लेख संबंधित वृत्तात करण्यात आला आहे.
पाकिस्तानवर आधीही ओढावलीये नामुष्की
पाकिस्तानमध्ये परदेशी नागरिकांवरील हल्ले हा चर्चेचा मुद्दा राहिला आहे. २०२४ मध्ये शांगला येथे चिनी अभियंत्यांवर झालेला हल्ला आणि २००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेला दहशतवादी हल्ला यासारख्या घटनांमुळे पाकिस्तानची आधीच बदनामी झाली आहे.