Join us

पाकिस्तानची द. आफ्रिकेवर अखेरच्या चेंडूवर मात, आझमचे शतक

खेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने शुक्रवारी द. आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 05:02 IST

Open in App

सेंच्युरियन : अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने शुक्रवारी द. आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला. पाकिस्तानला अखेरच्या षटकात सहा चेंडूत तीन धावांची गरज होती. फेलुकवायोने फहीम अश्रफला पहिले चार चेंडू निर्धाव टाकताच पाकच्या तंबूत अनिश्चितता पसरली होती. अखेर फहीमनेच पाचव्या चेंडूवर दोन धावा करीत बरोबरी साधून दिली. अखेरच्या चेंडूवर त्याने एक धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.द. आफ्रिकेच्या ५० षटकातील ६ बाद २७३ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकने ७ बाद २७४ धावा करीत सामना जिंकला.कर्णधार बाबर आझम याने १०४ चेंडूत १७ चौकारांसह १०३ तसेच सलामीवीर इमाम उल हक याने ७० धावा केल्या. मधल्या फळीत रिझवान (४०)आणि शादाब खान (३३) यांनीदेखील महत्त्वाचे योगदान दिले. एन्रिच नॉर्खियाने ५१ धावा देत सर्वधिक चार गडी बाद केले. त्याआधी, वान डर दुसेनच्या १३४ चेंडूतील दहा चौकार आणि दोन षटकारांसह १२३ धावांच्या जोरावर द. आफ्रिकेने आव्हानात्मक मजल गाठली होती. डेव्हिड मिलर ५०, फेलुकवायो २९ आणि क्विंटन डिकॉकने २० धावा करीत धावसंख्येला आकार दिला. पाककडून शाहीन आफ्रिदी आणि रौफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका : ५० षटकात ६ बाद २७३ धावा(वान डर दुसेन नाबाद १२३, मिलर ५०, फेलुकवायो २९, डिकॉक २०) गोलंदाजी : शाहीन आफ्रिदी २/६१, हॅरिस रौफ २/७२, मोहम्मद हुसेन, फहीम अश्रफ प्रत्येकी एक बळी. पाकिस्तान : ५० षटकात ७ बाद २७४ धावा (आझम १०३, इमाम उल हक ७०, मोहम्मद रिझवान ४०, शादाब खान ३३, फहीम अश्रफ नाबाद ५) गोलंदाजी : एन्रिच नॉर्खिया ४/५१, कासिगो रबाडा १/५१,फेलुकवायो २/५६.

टॅग्स :पाकिस्तान