Join us  

Sania Mirza: काही महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोट, शोएब मलिकला शुभेच्छा; सानियानं सोडलं मौन

पाकिस्तानी संघाचा खेळाडू शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:40 PM

Open in App

Sania Mirza and Shoaib Malik Divorce: पाकिस्तानी संघाचा खेळाडू शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. त्याने सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आहे. या प्रकरणावर सानियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण याबाबत सानियाच्या घरच्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सानिया आणि शोएबच्या नात्याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाला होता, असा या पोस्टमध्ये उल्लेख आहे.

शोएब मलिकनेपाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. सानियाच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता एक निवेदन जारी करण्यात आले आहे. सानियाच्या वडिलांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

सानियानं सोडलं मौन पोस्टमध्ये सांगण्यात आले की, सानिया तिचे वैयक्तिक आयुष्य लोकांपासून नेहमी दूर ठेवते. मात्र, काही महिन्यांपूर्वी शोएब आणि सानिया यांचा घटस्फोट झाला. तिने शोएबला त्याच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या कठीण काळात, सर्व चाहते आणि प्रियजनांनी त्यांच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी अशी विनंती आहे.

खरं तर शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. सानियाने शोएबपासून तलाक घेतलेला नाही तर त्यांचा 'खुला' झाला आहे, असे सानियाच्या वडिलांनी सांगितले. लग्नाचे नाते जेव्हा पुरूषाकडून संपवले जाते तेव्हा त्यास तलाक म्हणतात आणि स्त्रीने लग्नाचे नाते संपवले तर त्याला खुला म्हणतात, अशी माहिती सांगितली जात आहे. 

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असं आहे. पण, कोरोना काळानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला. मग घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आणि शनिवारी या चर्चांवर अखेर पडदा पडला.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकपाकिस्तानटेनिसघटस्फोट