Imad Wasim Retirement, Pakistan Cricket : पाकिस्तानी खेळाडूंच्या बाबतीत अजब-गजब गोष्टी अनेकदा घडताना दिसतात. पाकिस्तानचा धमाकेदार फलंदाज शाहिद आफ्रिदीने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेत पुनरागमन केले होते. त्याचप्रमाणे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू इमाद वासिम यानेही १३ महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इमादने सुमारे एक वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली होती. पण नंतर एका खास कारणासाठी त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. आता १३ महिन्यांनी त्याने पुन्हा एकदा निवृत्ती घेतली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती
आपल्या निवृत्तीबाबत इमादने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहिला. भावना व्यक्त करताना तो म्हणाला, "बऱ्याच विचारमंथनानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा अभिमानाचा क्षण होता. ती हिरवी जर्सी घालण्याचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी मला खूप प्रेम आणि सपोर्ट दिला. माझ्या आयुष्यात क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मला चाहत्यांच्या प्रेमातूनच मिळत राहिली. देशासाठी खेळताना अनेक चांगले वाईट क्षण आले, पण त्या क्षणांमध्ये तुमची लाभलेली साथ ही जमेची बाजू ठरली."
"मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे थांबवत असलो तरीही देशांतर्गत आणि फ्रँचायजी क्रिकेट खेळतच राहणार आहे. त्या माध्यमातून माझ्या खेळाने मी चाहत्यांना नेहमीच आनंद देत राहिन," असे सांगत त्याने आपला फ्युचर प्लॅन देखील स्पष्ट केला.
पहिल्यांदा निवृत्ती मागे का घेतली?
इमाद वासिमने नोव्हेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. तसे त्याने जाहीर देखील केले होते. पण ICC T20 World Cup 2024 पूर्वी त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
त्यानुसार तो २०२४चा टी२० विश्वचषक पाकिस्तानकडून खेळला. या टी२० विश्वचषकात त्याने फारशी छाप उमटवली नाही. त्यामुळे नंतर इमादला संघात स्थान मिळू शकले नाही. अखेर आज त्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले.