पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना हा रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. आज खेळाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये आघाडीची फळी कोसळल्यानंतर भारतीय वंशाचा फलंदाज सेनुराम मुत्थुसामी याने तळाच्या दोन फलंदाजांच्या मदतीने डाव सावरत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चारशेपार मजल मारून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात चार फलंदाज झटपट बाद झाल्याने पाकिस्तानचा डाव अडचणीत सापडला आहे.
काल पाकिस्तानने पहिल्या डावात ३३३ धावा फटकावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र आज सकाळच्या सत्रात चार फलंदाज झटपट बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची अवस्था ८ बाद २३५ अशी झाली होती. आता पाकिस्तान उरलेल्या फलंदाजांना झटपट बाद करत मोठी आघाडी घेणार असं दिसत असतानाच सेनुराम मुत्थुसामी याने एक बाजू लावून धरली. त्याने केशव महाराजसह नवव्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला तीनशेपार पोहोचवले. केशव महाराज ३० धावा काढून बाद झाला.
मात्र त्यानंतर अखेरचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या कागिसो रबाडा याने कमालच केली. मुत्थुसामीने एक बाजू लावून धरली असताना कागिसो रबाडा याने चौकार षटकारांची बरसात करत पाकिस्तानी गोलंदाजांनी झोडपून काढले. मुत्थुसामी आणि रबाडा यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेल्या ९८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ४०० धावांचा टप्पा ओलांडला. मात्र ४ षटकार आणि ४ चौकांरांसह ७१ धावांची झंझावाती खेळी करणाऱा रबाडा बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव ४०४ धावांवर संपला. तर मुत्थुसामी ८९ धावा काढून नाबाद राहिला. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. मात्र तोपर्यंत त्याने संघाला ७१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून देण्यात यश मिळवलं.
त्यानंतर पाकिस्तानच्या दुसऱ्या डावाला निराशाजनक सुरुवात झाली. रबाडा आणि हार्मरच्या भेदक माऱ्यापुढे तीन फलंदाज झटपट बाद झाल्याने एकवेळ त्यांची ३ बाद १६ अशी अवस्था झाली होती. अखेरीस बाबर आझमने एक बाजू लावून धरल्याने तिसऱ्या दिवस अखेर पाकिस्तानला ४ बाद ९४ धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानकडे आता २३ धावांची आघाडी असून, त्यांच्या हाती ६ गडी आहेत.