Will Young Brings Up The First Century Of 2025 Champions Trophy : पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग (Will Young) याने दमदार शतकी खेळीसह लक्षवेधून घेतलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पहिलं शतक झळकवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. एवढेच नव्हे तर यंदाच्या हंगामातील पहिला षटकारही त्याच्याच भात्यातून आला. आयसीसी स्पर्धेतील त्याचे हे पहिले वहिले शतक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ अडचणीत असताना केली आश्वासक खेळी
नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूनं लागल्यावर विल यंग आणि डेवॉन कॉन्वे या जोडीनं न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. ही जोडी सेट होतीये असं वाटत असताना अब्रार अहमदनं कॉन्वेच्या रुपात न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. तो १० धावा करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला केन विलियम्सन अवघ्या एका धावेवर तंबूत परतला. डॅरियल मिचेलनंही अवघ्या १० धावा काढून तंबूचा रस्ता धरला. न्यूझीलंडच्या संघानं ७३ धावांवर आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत सापडला असताना आश्वासक खेळीसह डाव सावरत विल यंगनं शतकाला गवसणी घातली.
पठ्ठ्यानं संधीच सोनं करून दाखवलं
न्यूझीलंडच्या ताफ्यात रचिन रवींद्र हा प्लेइंग इलेव्हनची पहिली पसंती आहे. पण तो दुखापतग्रस्त असल्यामुळे विल यंगला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या लढतीत संघाच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. या संधीच सोन करताना त्याने स्पर्धेत पहिलं शतक झळकवण्याचा पराक्रम केला. पाकिस्तान विरुद्धच्या लढतीआधी विल यंग याने ४१ वनडे सामन्यातील ४१ डावात ११ अर्धशतके आणि ३ शतकासह १६०७ धावा केल्या होत्या. आता त्याच्या खात्यात वनडेतील चौथ्या शतकाची नोंद झाली आहे.