Shaheen Afridi On Mohammad Amir: आगामी जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच संघ तयारीला लागले आहेत. अशातच पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने सुमारे ४ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. पण मोहम्मद आमिर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जर्सीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमिरने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
खरं तर या गोलंदाजाने पाकिस्तानचा तत्कालीन गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस आणि मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक याच्यावर भेदभावाचा आरोप केला होता. यानंतर मोहम्मद आमिरने निवृत्ती जाहीर केली. आमिरच्या पुनरागमनाच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने मोठे विधान केले आहे. मॅच फिक्सिंगमुळे आमिरच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
शाहीन आफ्रिदीने दिले संकेत पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याबाबत माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरशी बोलणार असल्याचे शाहीन आफ्रिदीने म्हटले आहे. नुकताच ILT20 2024 चा हंगाम खेळला गेला. मोहम्मद आमिर आणि शाहीन आफ्रिदी यांनी या स्पर्धेत डेझर्ट वायपर्सचे प्रतिनिधित्व केले. दोघांमधील बॉन्डिंग चांगले असल्याने शाहीन आमिरसाठी बॅटिंग करत असल्याचे कळते.
शाहीन आफ्रिदीला मोहम्मद आमिरच्या पुनरागमनाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, मोहम्मद आमिरला पुन्हा एकदा पाकिस्तानकडून खेळायचे असेल तर मी त्याच्याशी नक्की बोलेन. मोहम्मद आमिर आणि मी जवळपास ५ वर्षांनी एकत्र गोलंदाजी केली. मोहम्मद आमिरसोबत गोलंदाजी करण्याचा माझा अनुभव चांगला आहे. शिवाय आमची मैत्री देखील चांगली आहे.