आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आली आहे. मैदानावरील खराब कामगिरी आणि भारताविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संताप व्यक्त करत संघातील प्रत्येक खेळाडूवर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटच्या इतिहासात कामगिरीच्या आधारावर खेळाडूंना इतका मोठा आर्थिक दंड करण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दंडाची ही रक्कम खेळाडूंच्या मासिक पगारातून किंवा मॅच फीमधून वजा केली जाणार आहे. सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या या संघाला खराब कामगिरी केल्यास आता आर्थिक फटका बसेल, असा कडक इशारा बोर्डाने दिला आहे.
श्रीलंकेत झालेल्या या विश्वचषकात पाकिस्तानला घरच्या परिस्थितीसारख्या खेळपट्ट्या मिळूनही त्याचा फायदा घेता आला नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला पाकिस्तानने नेदरलँड्सविरुद्ध ३ विकेट्सने विजय मिळवला. मात्र, त्यासाठी पाकिस्तानला संघर्ष करावे लागले. पुढे अमेरिकेला ३२ धावांनी हरवून सुपर ८ च्या स्पर्धेत कायम राहिले. परंतु, भारताविरूद्धच्या सामन्यात त्यांना ६१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने संघातील उणिवा जगासमोर आणल्या.
पाकिस्तानचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचूनही नशिबाने त्यांना साथ दिली नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. तर, इंग्लंडकडून २ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवूनही नेट रन रेटच्या गणितात अडकल्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.