Join us

'बाप'माणूस शाहीन आफ्रिदी! पत्नी अंशाचे मानले 'खास' आभार; अलियारच्या येण्याने भारावला

shaheen afridi wife : शाहीन आफ्रिदीने पत्नी अंशा आफ्रिदीचे आभार मानले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:39 IST

Open in App

shaheen afridi son name : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी बाप झाला आहे. शनिवारी बांगलादेशविरूद्ध कसोटी सामना खेळत असताना आफ्रिदीला ही खुशखबर मिळाली. मग बळी घेताच त्याने अनोखे सेलिब्रेशन करून आनंद साजरा केला. पाकिस्तानने सामना गमावल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र, अशातच शाहीन आफ्रिदीने आपल्या बाळासोबतचा एक फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले. तसेच त्याने पत्नी अंशा आफ्रिदीचे खास आभार मानले. 

हा क्षण सर्वकाही बदलणारा आहे. माझे हृदय भरून आले असून, माझे आयुष्य अधिक चांगले झाले आहे. २४-८-२०२४ हा दिवस आमच्यासाठी नेहमीच खास असेल. माझा मुलगा अलियार आफ्रिदीचे या जगात स्वागत आहे. माझ्या पत्नीला तिला सहन कराव्या लागलेल्या सर्व वेदना आणि त्रासांबद्दल मी तिचा सदैव ऋणी राहीन. ती आमच्या छोट्याश्या कुटुंबाचा खूप मोठा आधार आहे. आम्हाला सर्वच स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, असे शाहीन आफ्रिदीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले.

दरम्यान, शाहीन आणि अंशा यांचे दोनवेळा लग्न झाले. शाहीन आफ्रिदीने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अंशाशी लग्न केले होते. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांचे अनेक नातेवाईक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. याच कारणामुळे शाहीनने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणून नातेवाईकांच्या उपस्थितीत शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला.

बांगलादेशची विजयी सलामी 

पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. मग बांगलादेशने प्रत्युत्तरात असामान्य कामगिरी केली. त्यांनी सर्वबाद ५६५ धावा करून शेजाऱ्यांना घाम फोडला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ १४६ धावा केल्याने बांगलादेशला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. बांगलादेशने एकही गडी न गमावता ३० धावा करून पहिला सामना आपल्या नावावर केला. 

टॅग्स :पाकिस्तानऑफ द फिल्ड