Pakistan ODI Tri-Series 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तीन देशांत तिरंगी वनडे मालिका खेळवण्यात येत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघात पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झके (Matthew Breetzke) या सलामीवीरांने नवा इतिहास रचला आहे. पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात १५० धावा करण्याचा पराक्रम त्याने करून दाखवलाय. याआधी वनडेत अशी कामगिरी कुणालाच जमली नव्हती. २६ वर्षी युवा सलामीवीरानं न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हा मोठा डाव साधला आहे.
कॅप्टनसच्या साथीनं डावाला सुरुवात, पदार्पणात केला मोठा धमाका
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बवुमानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कॅप्टन बवुमासह मॅथ्यू ब्रीट्झके याने संघाच्या डावाची सुरुवात केली. एका बाजूला अनुभवी बॅटर टेम्बा बवुमा अवघ्या २० धावा काढून माघारी फिरला. तर दुसऱ्या बाजूला धमाकेदार पदार्पण करत मॅथ्यून विश्वविक्रम सेट करण्याचा डाव साधला. पदार्पणाच्या वनडेत त्याने १४८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने १५० धावा कुटल्या. ही वनडे पदार्पणातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
कॅरेबियन खेळाडूला विक्रम मोडला
दक्षिण आफ्रिकेच्या उजव्या हाताच्या फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झ याने ४७ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं सेट केलेला विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी वनडे पदार्पणात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड हा कॅरेबियन डेसमंड हेन्स या खेळाडूच्या नावे होता. त्याने १९७८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात १४८ धावांची खेळी केली होती. हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरानं मोडीत काढला आहे.
एकदिवसीय सामन्यातील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
मॅथ्यू ब्रिट्झके (दक्षिण आफ्रिका) - १५० विरुद्ध न्यूझीलंड, २०२५
डेसमंड हेन्स (वेस्ट इंडिज) - १४८ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९७८
रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान) - १२७ विरुद्ध आयर्लंड, २०२१
कॉलिन इंग्राम (दक्षिण आफ्रिका) - १२४ विरुद्ध झिम्बाब्वे, २०१०