Pakistan Hindu Cricketer legs cut: क्रिकेटपटूंना त्यांच्या कारकिर्दीत अनेक दुखापतींना सामोरे जावे लागते. काही खेळाडू दुखापतींमुळे निवृत्ती देखील घेतात. पण पाकिस्तानच्या क्रिकेट जगतातून एक अशी एक बातमी आली आहे, जी ऐकून तुम्हालाही खूपच वाईट वाटेल. पाकिस्तानमध्ये एका क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापावे लागले आहेत. या घटनेमागील कारणदेखील तितकेच वेदनादायक आहे. या खेळाडूने पाकिस्तानकडून लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहे. त्या हिंदू खेळाडूबद्दल वाचल्यावर तुम्हीही नक्कीच म्हणाल की अशी वेळ शत्रूवरही येऊ नये.
पाकिस्तानी हिंदू खेळाडूचे दोन्ही पाय कापण्यात आले...
माजी पाकिस्तानी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मोहिंदर कुमार यांच्याशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. कराचीमध्ये मधुमेही म्हणजेच डायबेटिस असलेल्या मोहिंदर यांना पायाच्या संसर्गामुळे त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. संसर्ग इतका गंभीर झाला की त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मोहिंदर कुमार यांनी पाकिस्तानातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली होती. खेळाडू म्हणून त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त, त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली. त्यांनी कठोर परिश्रम घेत नवे क्रिकेटपटू घडवले. पण मधुमेहासारख्या आजाराने त्यांचे आयुष्य आता एका कठीण वळणावर आले आहे. त्यामुळेच या घटनेने क्रिकेट जगतात अतिशय दु:ख व्यक्त केले जात आहे.
मोहिंदर कुमारची क्रिकेट कारकीर्द
६५ वर्षीय महेंद्र कुमार यांनी १९७६ ते १९९४ पर्यंत पाकिस्तानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. या काळात ते ६५ प्रथम श्रेणी सामने आणि ५३ लिस्ट ए सामन्यांचा भाग बनले. ते एक वेगवान गोलंदाज होते. त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांनी २६.४१ च्या सरासरीने एकूण १८७ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एका डावात १० वेळा ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्यांनी केला. त्यांनी ४ वेळा सामन्यात १० विकेट्सही घेतल्या. तसेच दुसरीकडे, त्यांनी लिस्ट ए मध्ये ६४ विकेट्स घेतल्या.
बडे खेळाडू घडवले
मोहिंदर कुमार यांनी १९७६ मध्ये पाकिस्तान PWD कडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर मुदस्सर नजर, हारून रशीद, सिकंदर बख्त आणि सलीम युसूफ सारख्या दिग्गजांसोबत UBL आणि ADBP कडून खेळले. त्यांनी सोहेल खान, मोहम्मद सामी, दानिश कनेरिया, तन्वीर अहमद आणि नौमानुल्ला यांच्यासह अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे.