Pakistan Have Beaten Namibia And Qualify For The Super 8s : साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने नामिबियाला पराभूत करत सुपर ८ फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. सुपर ८ मधील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी पाकिस्तानच्या संघाने नामिबियासमोर २०० धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ शंभरीच्या आत आटोपला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सुपर ८ मध्ये या तगड्या संघाचे असेल आव्हान
सुपर ८ मध्ये पाकिस्तानचा संघ दुसऱ्या गटात आहे. सेमीचा प्रवास निश्चित करण्यासाठी त्यांच्यासमोर आता यजमान श्रीलंकेसह न्यूझीलंड आणि इंग्लंडचे तगडे आव्हान असेल. श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे ते सेमीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याशिवाय न्यूझीलंड संघाचा ICC च्या स्पर्धेत पहिल्या चारमध्ये खेळण्याचा दमदार रेकॉर्ड आहे. इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानसमोर या दोन संघाचे तगडे आव्हान असेल.
साहिबजादा फरहान आणि सलमान अली आगाची अर्धशतकी भागीदारी
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सईम अयूबने १४ धावांवर आपली विकेट गमावल्यावर साहिबजादा फरहान आणि कर्णधार सलमान अली आगा जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सलमान अली आगा २३ चेंडूत ३८ धावांची भर घालून माघारी फिरल्यावर त्याच्या जागी आलेल्या ख्वाजा नाफय फक्त ५ धावांवर माघारी फिरला.
अखेरच्या षटकात साहिबजाला मिळाली शादाब खानची साथ
अखेरच्या षटकात शादाब खानच्या साथीनं साहिबजादा फरहान याने ४० चेंडूत ८१ धावांची दमदार भागीदारी करत संघाच्या धावफलकावर ३ विकेट्सच्या मोबदल्यात १९९ धावा लावल्या. साहिबजादानं ५८ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला शादाबनं २२ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली. यात त्याने १ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार मारले.
गोलंदाजीत पाकच्या संघाकडून उस्मान तारिकचा 'चौकार'
पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर लुरेन स्टीनकॅम्प २३ (२२) आणि अलेक्झांडर वोल्शेंक २० (२०) या दोघांशिवाय नामिबियाच्या एकाही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. गोलंदाजीत पाकिस्तानकडून उस्मान तारिक याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय शादाब खान याने ३ तर मोहम्मद नवाझ आणि सलमान मिर्झा यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.