Join us

Rohit Sharma, IND vs PAK: "रोहित शर्मा जे बोलला ते मला अजिबात पटलेलं नाही"; Pakistan च्या माजी क्रिकेटपटूने मांडलं रोखठोक मत

रोहित शर्माने नक्की काय वक्तव्य केलं होतं वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:52 IST

Open in App

Rohit Sharma, IND vs PAK: भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरूद्धची पहिली कसोटी मोठ्या फरकाने जिंकली. भारतीय संघाने (Team India) प्रथम फलंदाजी करताना ५७४ धावा कुटल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव १७८ वर तर दुसरा डाव १७४ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने एक डाव आणि २२२ धावांनी सामना खिशात घातला. या सामन्यात रविंद्र जाडेजाने नाबाद १७५ धावा आणि ९ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली. आर अश्विननेदेखील (R Ashwin) ६१ धावा आणि ६ बळी अशी उल्लेखनीय कामगिरी केली. सामन्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याशी पाकिस्तानच्या (Pakistan) एका माजी क्रिकेटपटूने असहमती दर्शवली. 

"अश्विन हा महान गोलंदाज आहे यात शंका नाही. त्याने आपल्या गोलंदाजीत वैविध्य आणले आहे. एसजीच्या चेंडूने मायदेशातील कामगिरीबाबत बोलायचं असेल तर घरच्या मैदानावर अश्विन भारतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे यात शंका नाही. परदेशातील परिस्थितीत अश्विनबद्दल रोहितने जे मत मांडलंय त्याच्याशी मी सहमत नाही. कारण अनिल कुंबळे हा खूप चांगला स्पिनर होता. त्याने परदेशातही खरोखरच चांगली कामगिरी केली. जाडेजानेही चांगली कामगिरी केली आहे. भूतकाळात, बिशनसिंग बेदीही चलाख गोलंदाज होते. त्यामुळे अश्विन हा सर्वकालीन सर्वोत्तम स्पिनर असल्याचं रोहितचं मत मला मान्य नाही", असं रशिद लतीफने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये सांगितले.

रोहित नक्की काय म्हणाला होता?

"माझ्या दृष्टीने अश्विन ऑल टाईम ग्रेट आहे. तो इतकी वर्षे खेळत आहे आणि देशासाठी परफॉर्मन्स देत आहे. त्याने मोक्याच्या क्षणी अनेक मॅच-विनिंग परफॉर्मन्स दिले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी तो ऑल टाईम ग्रेट आहे. लोकांचे मुद्दे वेगळे असू शकतात. त्यांचा दृष्टिकोनही वेगळा असू शकतो. पण मी जे पाहिलंय त्यात मला अश्विन हा सर्वकालीन महान खेळाडू वाटतो", असं रोहित पहिल्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत म्हणाला होता.

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मापाकिस्तानआर अश्विन
Open in App