लॉर्ड्स: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्मार्ट वॉच घालून खेळणं पाकिस्तानी खेळाडूंना महागात पडताना दिसतंय. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचे दोन खेळाडू अॅपल स्मार्ट वॉच घालून मैदानात उतरले होते. त्यामुळे हे खेळाडू आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या निशाण्यावर आहेत. सामन्यादरम्यान स्मार्ट वॉच न वापरण्याची ताकीद या खेळाडूंना आयसीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
लॉर्ड्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी पाकिस्तानचे असद शफीक आणि बाबर आझम अॅपल स्मार्ट वॉच घालून मैदानात उतरले. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला. स्मार्ट वॉचला फोननं कनेक्ट करता येतं. याशिवाय मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व हाय-टेक सुविधा या घड्याळ्यात असतात. त्यामुळे या माध्यमातून फिक्सिंग केलं जाऊ शकतं, अशी भीती आयसीसीला आहे.
स्मार्ट वॉच घालून खेळणाऱ्या दोन्ही खेळाडूंच्या मैदानातील हालचाली संशयास्पद नव्हत्या. ही पाकिस्तानी खेळाडूंसाठी जमेची बाजू आहे. स्मार्ट वॉच वापरणाऱ्या खेळाडूंना समज देण्याच्या वृत्ताला वेगवान गोलंदाज हसन अलीनं दुजोरा दिला. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मैदानात स्मार्ट वॉच न घालण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आता आमच्या संघाचा कोणताही खेळाडू स्मार्ट वॉच घालून मैदानात उतरणार नाही, असं अलीनं सांगितलं.