पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुस्ताक हा त्याच्या काळातील जगातील एक महान गोलंदाज म्हणून गणला जात होता. आता त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनासंदर्भात आणि त्याच्या कुटुंबाच्या भूतकाळासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. खरे तर त्याने एक मोठे रहस्य उघड केले आहे. तसेच, आपले भारतासोबत जुने नाते असल्याचा दावाही त्याने केला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर सकलेन मुस्ताकने 'दुसरा' नावाचा फिरकी गोलंदाजीचा एक घातक प्रकार शोधल्याचे मानले जाते. सकलेन मुस्ताकने पाकिस्तानसाठी एकूण १६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत, यांत त्याने २८८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने ४९ कसोटी सामन्यांमध्ये २०८ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
सकलेन मुस्ताकचे भारतीय कनेक्शन - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९६ विकेट्स घेणारा माजी ऑफ स्पिनर सकलेन मुस्ताकने पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनेलवर एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. आपले भारतातील अमृतसरसोबत फार जुने संबंध आहेत. आपले कुटुंब तेथीलच आहे. माझ्या पणजोबांचे नाव रूड सिंग असे होते. ते मुस्लीम झाले होते." महत्वाचे म्हणजे, "भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा आपल्याच गावचा असल्याचा खुलासाही सकलेन मुस्ताकने केला आहे.
भारतातून येऊन पाकिस्तानात स्थायिक झाले पणजोबा - सकलेन मुस्ताक म्हणाला, 'कपिल शर्मा माझ्या गावचा (अमृतसरमधील) आहे.' माझी आणि कपिल शर्माची दुबईत भेट झाली होती. तेव्हा आम्ही अमृतसरसंदर्भात बऱ्याच गप्पा मारल्या होत्या. तेव्हा मी कपिल शर्माला विचारले होते की, 'तू अमृतसरचाच आहेस का?' या वेळी सकलेन मुस्ताकने आपल्या चाहत्यांना सांगितले की, "त्याचे पणजोबा अमृतसरमध्येच राहत होते, त्यांचे नाव रूड सिंग असे होते. ते मुस्लीम झाले आणि नंतर भारतातून पाकिस्तानात आले आणि स्थायिक झाले."