Pakistan Cricketer in IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात २००८ मध्ये झाली. ही लीग आता जगातील सर्वात श्रीमंत टी२० क्रिकेट लीगपैकी एक आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूही स्पर्धेत खेळताना दिसले होते. पण २००८ मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली. असे असले तरी आता आयपीएलच्या पुढील हंगामात एक पाकिस्तानी खेळाडू खेळताना दिसू शकतो. या खेळाडूने स्वतःच याबाबतची माहिती दिली आहे.
IPL खेळण्याच्या तयारीत पाकिस्तानी क्रिकेटपटू
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोहम्मद आमिरने २०२६ मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास पात्र असल्याचे उघड केले आहे आणि संधी मिळाल्यास तो IPL खेळेल असेही म्हटले आहे. मोहम्मद आमिरची पत्नी नर्गिस ही यूकेची नागरिक आहे. आमिर देखील यूकेमध्ये राहतो. अशा परिस्थितीत त्याने यूके नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. जर त्याला नागरिकत्व मिळाले तर तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरेल असे सांगितले जात आहे.
IPL मध्ये खेळल्यास पाकिस्तानी काय म्हणतील...
'हारना मन है' या पाकिस्तानी शोमध्ये मोहम्मद आमिर म्हणाला की, पुढच्या वर्षी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि जर संधी मिळाली तर मी नक्कीच आयपीएलमध्ये खेळेन. यादरम्यान, शोच्या होस्टने आमिरला विचारले, 'आयपीएलमध्ये खेळल्याबद्दल पाकिस्तानमध्ये जेव्हा तुझ्यावर टीका होईल तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय असेल?' यावर आमिर म्हणाला, 'आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आली होती, पण आमचे माजी क्रिकेटपटू समालोचन करत होते आणि फ्रँचायझींचे प्रशिक्षकही होते. त्यामुळे माझ्या समावेशाने फार बिघडेल असं मला वाटत नाही.'
याआधीही एकदा 'असं' घडलंय...
दरम्यान, आमिरच्या या विधानाद्वारे त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रम आणि रमीझ राजा या दोघांना लक्ष्य केले. वासिम अक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक होता आणि रमीझ राजा आयपीएलमध्ये समालोचन करत होता. त्यामुळे आमिरदेखील खेळताना दिसू शकतो. यापूर्वीही आयपीएलमध्ये असे एकदा घडले आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला अझर मेहमूद ब्रिटिश नागरिक झाला होता. त्यामुळे तो २०१२ ते २०१५ दरम्यान आयपीएलचा भाग होता. २००३ मध्ये त्याने ब्रिटीश नागरिक इबा कुरेशीशी लग्न केले होते, त्यानंतर त्याला ब्रिटीश नागरिकत्व मिळाले होते. त्यामुळेच तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जकडून खेळला होता.