Pakistan Terrorists Freedom Fighter Controversy: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू भारतीयांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भारतासह जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. पण याचदरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डर यांने पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा उल्लेख 'स्वातंत्र्य सैनिक' असा केला आहे. या असंवेदनशील विधानानंतर पाकिस्तानविरोधात पुन्हा एका साऱ्यांच्याच भावना तीव्र झाल्या आहेत. याचदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानेही पाकिस्तानला घरचा अहेर दिला आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान काय म्हणाले?
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डर यांनी म्हणाले की, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात हल्ला करणारे लोक हे स्वातंत्र्य सैनिक असू शकतात. पहलागम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी हे विधान केले. यावेळी इशाक डर यांनी भारताला इशाराही दिला. जर भारताने पाकिस्तानला धमकावले किंवा हल्ला केला, तर पाकिस्तानसुद्धा त्याच पद्धतीचे प्रत्युत्तर देईल. जर पाकिस्तानवर थेट हल्ला करण्यात आला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी धमकीही इशाक डर यांनी दिली.
दानिश कनेरियाने केली टीका
"जेव्हा पाकिस्तानचेच उपपंतप्रधान दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधतात त्यावेळी ही केवळ शरमेची बाब नाही तर पाक पुरस्कृत दहशतवादाला उघडपणे निमंत्रण आहे", असे ट्विट दानिश कनेरियाने केले.
याआधी दोन दिवसांपूर्वीही दानिशने पाकिस्तानची लक्तरं काढली होती. "पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जर पाकिस्तानचा खरंच काहीही संबंध नसेल तर पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आतापर्यंत या हल्ल्याचा निषेध का केलेला नाही? पाकिस्तानातील सुरक्षादलांना अचानक हाय अलर्ट का देण्यात आला आहे? कारण कितीही नाकारलं तरी तुम्हालाही सत्य माहिती आहे की, तुम्हीच दहशतवाद्यांना आश्रय देताय आणि पोसताय. तुमची लाज वाटते," असे ट्विट दानिश कनेरियाने केले होते.