२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे आधीच टीकेचा धनी ठरलेला पाकिस्तान क्रिकेट संघ आता एका गंभीर वादामुळे अडचणीत सापडला आहे. श्रीलंकेतील कँडी येथे एका महिला हॉटेल कर्मचाऱ्याची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली एका पाकिस्तानी खेळाडूला मोठा दंड ठोठावण्यात आला. या घटनेने क्रीडा विश्वात खळबळ उडाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कॅंडी येथील गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये घडली. टी-२० विश्वचषकातील सुपर ८ फेरीच्या शेवटच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. त्यावेळी हॉटेलमधील हाऊसकीपिंग विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याशी पाकिस्तानी खेळाडूने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पिडीत महिला मदतीसाठी ओरडल्यानंतर हॉटेल कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी ही बाब तातडीने पाकिस्तानचे संघ व्यवस्थापक नवीद चीमा यांच्या कानावर घातली. हॉटेल प्रशासनाने संबंधित खेळाडूवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून व्यवस्थापक नवीद चीमा यांनी मध्यस्थी केली आणि खेळाडूच्या वतीने माफी मागितली आणि त्याला आर्थिक दंड ठोठावून हे प्रकरण अंतर्गत पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या खेळाडूचे नाव अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेले नाही. हे प्रकरण श्रीलंकेत तात्पुरते मिटवण्यात आले असले, तरी संबंधित खेळाडूच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेची दखल घेतली असून, मायदेशी परतल्यावर या खेळाडूवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.