Join us

"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

पाकिस्तानचा खेळाडू इफ्तिखार अहमदची संतप्त प्रतिक्रिया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:44 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेटमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शनिवारी निवडकर्ता मोहम्मद युसूफने वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आगामी काळात पाकिस्तानला आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पाकिस्तानात सध्या चॅम्पियन्स कपची स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा अष्टपैलू इफ्तिखार अहमद एका संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलत असताना पत्रकाराचा एक प्रश्न ऐकून इफ्तिखारचा पारा चढला. 'चॅम्पियन्स कपमध्ये कोणत्या युवा खेळाडूने सर्वांना प्रभावित केले असे तुला वाटते', या प्रश्नावर पाकिस्तानी खेळाडूने संतप्त प्रतिक्रिया दिली. 

पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना इफ्तिखार म्हणाला की, मीडियाने नक्की काय पाहिले? हे पाहा, मी कोणाच्याच विरोधात नाही. पण, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एका खेळीवरुन मीडियाने कोणत्याच खेळाडूला खूप हाइप देऊ नये. आमच्याकडे टॅलेंटेड युवा खेळाडू आहेत, त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अजून त्यांना दोन-तीन हंगाम खेळूद्या... मग ते पाकिस्तानसाठी कधी खेळणार याची चर्चा करा. खरे तर यावेळी इफ्तिखारने कोणत्याच खेळाडूचे नाव घेतले. 

इफ्तिखार अहमदचा संताप

तसेच मीडियामुळे पाकिस्तान क्रिकेटमधील वातावरण गढूळ झाले आहे. एका डावात चांगली कामगिरी केल्यावर तुम्ही त्याला झाडावर चढवता मग तो पाकिस्तानकडून खेळतो आणि अयशस्वी होतो तेव्हा तुम्हीच त्याच्यावर टीका करता. क्षमता नसलेल्यांना संधी दिली जाते असा आरोप मीडियाच करत राहते, अशा शब्दांत इफ्तिखार अहमदने मीडियावर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, पाकिस्तानला मागील जवळपास तीन वर्षांपासून आपल्या घरात एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदला कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि तिथेही त्यांना जबर मार खावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे WTC च्या शर्यतीत कायम राहणे शेजाऱ्यांना कठीण झाले आहे. वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची 'कसोटी' पाहायला मिळत आहे. खरे तर पाकिस्तानला तब्बल १,३०३ दिवसांपासून आपल्या घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. विशेष म्हणजे बांगलादेश नंतर इतर सर्वात जुन्या दहा कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी प्रत्येकाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावणारा पाकिस्तान हा दुसरा संघ ठरला आहे.

टॅग्स :पाकिस्तान