चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चांगलीच नामुष्की ओढावली आहे. आयसीसीच्या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येऊन खेळणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. परिणामी भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्याची वेळ यजमानांवर आली. याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता ही भरपाई करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंचा पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका सामन्यासाठी खेळाडूंना मिळणार फक्त ३००० रुपये
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नॅशनल टी-२० देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या सामना शुल्कातून जवळपास ७५ टक्के कपात केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी बोर्डाने खेळाडूंच्या खिशाला कात्री लावलीये, अशी चर्चा रंगत आहे. या सामन्यासाठी खेळाडूंना आधी प्रत्येक सामन्यासाठी भारतीय जवळपास १२ हजार रुपये मिळायचे. पण आता खेळाडूंना फक्त ३००० रुपयांमध्ये समाधान मानावे लागणार आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी क्रिकेट आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची गोष्ट बोलून दाखवली होती. पण शेजारच्या देशात आता सगळं अगदी उलट चित्रच पाहायला मिळतेय.
टीम इंडियाचा नकार अन् पाकिस्तानला झाला कोट्यवधीचा तोटा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद भूषवले. या स्पर्धेच्या माध्यमातून २९ वर्षांनी त्यांना आयसीसी स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली होती. पण भारतीय संघानं पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला आणि पाकिस्तानला त्याचा मोठा फटका बसला. काही अहवालानुसार, बीसीसीआयच्या भूमिकेमुळे पाकिस्तानला कोट्यवधीचं नुकसान झाले आहे. हा आकडा जवळपास ६० कोटी ७० लाख रुपयांच्या घरात आहे. भारतीय संघाच्या निर्णयाशिवाय प्रेक्षकांनी स्पर्धेकडे फिरवलेली पाठ, पावसाच्या व्यत्ययामुळे चाहत्यांना परत करावे लागलेले तिकाटांचे पैसे यामुळेही पाकिस्तान क्रिकेटला आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते.
PCB बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून अजब-गजब तर्क देत गरीबी झाकण्याचा प्रकार
एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंच्या मानधनात कपात केल्याची गोष्ट चर्चेत आहे. दुसरीकडे पाक अधिकाऱ्याने मात्र बोर्डाची गरीबी झाकण्यासाठी अजब गजब प्रतिक्रिया दिल्याचेही पाहायला मिळते. पाक बोर्डाकडे पैशाची कमी नाही. यंदाच्या हंगामात अधिक सामने होणार असून खेळाडूंना अधिक कमाई करता येईल, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कपातीचा खेळाडूंना फटका बसणार नाही, असा तर्क लावत सगळं ठिक आहे, असे भासवण्याचा प्रकार केला आहे.