Pakistan Cricket Team Squad, Champions Trophy : पाकिस्तानने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नुकताच आपला संघ जाहीर केला आहे. पण हा संघ एखादी बडी स्पर्धा जिंकण्यासाठी सक्षम आहे का? असा प्रश्नच आता उपस्थित केला जातोय. यामागचं कारण म्हणजे या संघातील काही खेळाडूंची निवड. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही निकषांच्या आधारावर हा संघ निवडला असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या संघाची रचना पाहता त्यातील अनेक खेळाडूंची पाटी कोरीच असल्याचे दिसून येत आहे. तर काहींबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानी दिग्गज खेळाडू अब्दुर रौफ खान यानेही याबाबत एका टीव्ही चॅनेलवर प्रश्न विचारले आहेत.
बाबर आझमवर संघ अवलंबून?
टीव्ही चॅनेलवर प्रसारित झालेल्या कार्यक्रमात असे म्हटले गेले होते की पाकिस्तानी संघ बाबर आझमवर अवलंबून आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बाबर आझमची बॅट चालली तरच काहीतरी घडू शकते. बाबर आझम व्यतिरिक्त शो मध्ये सौद शकीलवरही काहीसा विश्वास दाखवला गेला होता. पण, या दोघांशिवाय इतर कोणत्याही खेळाडूवर मॅचविनर म्हणून विश्वास दाखवणं शक्य नाही, असं स्पष्ट मत मांडण्यात आलं.
६ खेळाडूंवर सर्वाधिक शंका
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघावर विश्वास ठेवणे पाकिस्तानी दिग्गजांसाठी काहीचे कठीणच दिसतेय. कारण त्यातील ६ खेळाडू. त्या ६ खेळाडूंपैकी काहींनी एकही सामना खेळलेला नाही तर काहींनी सामना खेळून २ वर्षांपासून जास्त काळ उलटून गेलाय. जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल.
- फखर झमान- याने २०२३ च्या विश्वचषकात पाकिस्तानसाठी शेवटचा वनडे सामना खेळला
- उस्मान खान- पाकिस्तानकडून एकही वनडे सामना खेळलेला नाही
- फहीम अश्रफ- २०२३च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानकडून शेवटचा वनडे सामना खेळला
- खुसदिल शाह- ऑक्टोबर २०२३ मध्ये पाकिस्तानकडून शेवटचा वनडे सामना खेळला
- अबरार अहमद- अवघ्या ४ वनडे सामन्यांचा अनुभव
- तैयब ताहिर - अवघे ३ वनडे सामने खेळण्याचा अनुभव