लाहोर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाने शुक्रवारी १७ सदस्यीय संघ जाहीर केला. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर संघात बदल अपेक्षित होते आणि ते झालेच. भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचा दावा करणाऱ्या गोलंदाज मोहम्मद आमीरला तोंडघशी पडावे लागले. सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडणाऱ्या या गोलंदाजाला पाकिस्तान संघाने घरचा रस्ता दाखवला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या संघात पाकिस्तानने फिरकीपटू यासीर शाहवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. यासीरने २०१५ च्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२ विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानने ती मालिका २-० अशी जिंकली होती. यासीरसह पाकिस्तानने चमूत १९ वर्षीय फिरकीपटू शाबाद खान आणि ३३ वर्षीय फिरकीपटू बिलाल आसिफ यांना स्थान दिले आहे.
पाकिस्तान संघ - सर्फराज अहमद ( कर्णधार), अझर अली, फाखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम, असाद शफिक, हॅरीस सोहैल, उस्मान सलाहुद्दिन, यासीर शाह, शाबाद खान, बिलाल आसिफ, मोहम्मद अब्बास, हसन अली, वाहब रिआझ, फहीम अश्रफ, मीर हम्झा, मोहम्मद रिझवान.