Pakistan Blast, PAK vs Sri Lanka: इस्लामाबादमधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेवर झाला आहे. पाकिस्तानच्या राजधानीत झालेल्या कार बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट संघामध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट (SLC) ने कारवाईची धमकी देऊन आपल्या खेळाडूंना धमकावण्याचा प्रयत्न केला, परंतु याचा मालिकेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या परिस्थितीमुळे माघार घ्यावी लागलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिकेतील उर्वरित सामने एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
पीसीबीने वेळापत्रक बदलले
मंगळवारी ११ नोव्हेंबरला पाकिस्तानच्या राजधानीतील एका कोर्टाबाहेर झालेल्या स्फोटामुळे श्रीलंकेचा संघ खूपच घाबरला. सुमारे आठ ते दहा खेळाडू मालिका अर्ध्यावर सोडून श्रीलंकेला परतणार असल्याचे वृत्त समोर आले. श्रीलंकेच्या खेळाडूंच्या या कृतीमुळे पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी अडचणीत आले आणि त्यांनी श्रीलंकेच्या संघाचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी, १३ नोव्हेंबरला होणार होता, परंतु श्रीलंकेच्या खेळाडूंच्या निर्णयामुळे तो सामना आणि संपूर्ण मालिका धोक्यात आली. या पार्श्वभूमीवर, पीसीबी प्रमुखांनी नवीन वेळापत्रकानुसार, १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी होणारे उर्वरित सामने आता १४ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जातील असे सांगितले.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची धमकी
हे सामने होतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, कारण श्रीलंकेच्या खेळाडूंची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. दौरा सुरू राहावा यासाठी, श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने बुधवारी एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांच्या खेळाडूंना धमकी देण्यात आली. बोर्डाने त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता मालिका खेळा, सिरिज अर्ध्यावर सोडू नका असे आदेश दिले. शिवाय, SLCने असे म्हटले आहे की जो खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ सदस्य मध्येच परतेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल.