Join us  

PAK vs NZ: न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा! ट्वेंटी-२० मालिकेचा थरार; पण शेजाऱ्यांची फजिती

न्यूझीलंडचा संघ ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:13 PM

Open in App

येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश संघ ट्वेंटी-२० क्रिकेट खेळत आहेत. पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम खेळवला जात आहे. या स्पर्धेनंतर शेजारील संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अलीकडेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले असून सलामीचा सामना १८ एप्रिलला खेळवला जाईल. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, जिथे शेजाऱ्यांना पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तानने ट्वेंटी-२० मालिका खेळली. 

न्यूझीलंडचा पकिस्तान दौरा दरम्यान, जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलमुळे पाकिस्तानला झटका बसण्याची दाट शक्यता आहे. कारण न्यूझीलंडच्या संघातील वरिष्ठ खेळाडू आयपीएलमुळे पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाहीत. न्यूझीलंडचा दुय्यम संघ पाकिस्तानचा दौरा करेल. मिचेल सँटनर, डॅरिल मिचेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, ट्रेन्ट बोल्ट, ग्लेन फिलिप्स आणि लॉकी फर्ग्युसन हे शिलेदार पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेऊ शकतात. पाकिस्तान प्रथमच आपल्या घरात शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात द्विपक्षीय मालिका खेळत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मालिकेतील तीन सामने रावळपिंडी तर दोन सामने लाहोर येथे खेळवले जातील. 

PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

  1. १८ एप्रिल - रावळपिंडी
  2. २० एप्रिल - रावळपिंडी
  3. २१ एप्रिल - रावळपिंडी
  4. २५ एप्रिल - लाहोर 
  5. २७ एप्रिल - लाहोर 
टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेटन्यूझीलंडआयपीएल २०२४