पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेची ओपनिंग मॅच ही न्यूझीलंडसोबत ठेवण्यात आली आहे. परंतू, स्टेडिअममधील बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत. पाकिस्तानला पाकिस्तानातच क्रिकेट रसिक मिळत नसल्याचे यातून दिसत आहे. यामुळे पाकिस्तान बाता बड्या बड्या मारत असला तरी मिनी वर्ल्डकपकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने उर्वरित देशांच्या सामन्यांना कोण हजेरी लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२९ वर्षांनी पाकिस्तानात एखादी मोठी आयसीसीची स्पर्धा होत आहे. ती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतील अशी आशा आयसीसीलाही होती. परंतू, पाकिस्तानच्याच सामन्यांना स्टेडिअममधील रिकाम्या खुर्च्या पाहता उर्वरित सामन्यांना कोण येईल, अशी चिंता आता पीसीबीलाही वाटू लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पीसीबीने पैसा कमविण्याच्या हेतूने करोडो रुपये खर्च केले आहेत. अनेक स्टेडिअमचे बांधकामही नव्याने करण्यात आले आहे. मोठी स्पर्धा असल्याने भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला येईल आणि आपण खोऱ्याने पैसे ओढू असे पाकिस्तानला वाटले होते. परंतू, भारताने पाकिस्तानमध्ये खेळणार नाही अशी भूमिका घेतल्याने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यातच आता पाकिस्तान संघाच्या सामन्यांनाही कोणी बघायला येत नसल्याचे चित्र आहे.
पाकिस्तानातील या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याला प्रेक्षकांची नगन्य संख्या पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने पाकिस्तानची खिल्ली उडविली आहे. एक्सवर त्याने ''१९९६ नंतरचे पाकिस्तानातील मोठी स्पर्धा आहे, पाकिस्तान आपल्या लोकांना ही स्पर्धा सुरु झाल्याचे सांगायला विसरली आहे असे वाटतेय, गर्दी कुठे आहे, असा सवाल वॉनने केला आहे.
कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममधील अनेक स्टँड रिकामे आहेत. प्रेक्षक क्षमता सुमारे ३० हजार एवढी आहे. पाकिस्तान संघाची मॅच कराचीतच होणार असल्याने तिथे हाऊसफुल गर्दी असेल असे मानले जात होते. परंतू, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्येही प्रेक्षक दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.