Join us
Daily Top 2Weekly Top 5

PAK vs ENG : पाकिस्तानची 'कसोटी'! इंग्लंडने उतरवला तगडा संघ; घरच्या मैदानात लाज राखण्याचे आव्हान

England's XI for the second Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:53 IST

Open in App

pak vs eng 2nd test | मुल्तान : पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. सलामीच्या सामन्याला मुकलेला बेन स्टोक्स दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटीसाठी स्टोक्सच्या नेतृत्वातील संघ जाहीर केला. मंगळवारपासून मुल्तान येथे दुसऱ्या सामन्याचा थरार रंगेल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभव पत्कारावा लागला. सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून, तिथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. सलामीच्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि ४७ धावांनी पराभव केला. 

पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून पाहुण्या इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरीत मालिकेसाठी काही धाडसी निर्णय घेतले. रविवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उर्वरीत मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. संघाचा माजी कर्णधार बाबर आझम, प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि युवा गोलंदाज नसीम शाह यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातून डच्चू देण्यात आला. या तिघांना विश्रांती देण्यात आली असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले. मात्र, खराब फॉर्मचा सामना करत असलेले हे त्रिकुट साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ब्रिडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर. 

उर्वरीत मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ - शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, हसीबुल्लाह, कामरान घुलाम, मेहरान मुमताज, मीर हमझा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान, नोमान अली, सैय अयुब, साजिद खान, सलमान अली अघा, झाहीद मेहमूद. 

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान