Join us  

पाकिस्तानी खेळाडूने टोपीने अडवला चेंडू, तरीही ऑस्ट्रेलियाला का मिळाल्या नाहीत ५ पेनल्टी धावा

PAK vs AUS: पाकिस्तानच्या सैम अयुबच्या टोपीमुळे अडला चेंडू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 12:57 PM

Open in App

PAK vs AUS, ICC Rule: पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा सैम अयुब दुखापतीतून थोडक्यात बचावला. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने चेंडू मिडऑफवर खेळला. तो बॅटला नीट लागला नाही आणि अयुबने तो पकडण्यासाठी मागे धाव घेतली. त्याने प्रयत्न केला पण चेंडू अडवताना त्याचा गुडघा जमिनीत अडकला. असे घडले असतानाही एक वेगळीच गोष्ट घडली आणि त्यामुळे ICCचे फिल्डिंग संदर्भातले नियम पुन्हा चर्चेत आले.

स्टीव्ह स्मिथने मारलेला शॉट बाऊंडरीच्या दिशेने चालला असताना मध्येच अयुबच्या कॅपमध्ये अडकला आणि त्यामुळे चेंडू थांबला. यानंतरही ऑस्ट्रेलियन संघाला पेनल्टी मिळाली नाही. क्रिकेटच्या नियमांनुसार, जर खेळादरम्यान चेंडू क्षेत्ररक्षकाचे कपडे, उपकरणे किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या संपर्कात आला तर ती नियमबाह्य फिल्डिंग मानून त्यावर फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून ५ धावा दिल्य जातात.

ऑस्ट्रेलियाला बाऊंड्री का मिळाली नाही?

अयुबच्या कॅपला लागून चेंडू थांबला पण तरीही ऑस्ट्रेलियाला पेनल्टी धावा मिळाल्या नाहीत. ICC नियम 28.2.2 नुसार, सामन्यादरम्यान फिल्डरकडून चुकून पडलेल्या किंवा अंपायरशी संबंधित गोष्टींमुळे टाकलेल्या कपड्यांशी, उपकरणाच्या किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या संपर्कात आल्यास ती फिल्डिंग नियमबाह्य नसते. अयुबने फिल्डिंगचा प्रयत्न करत असताना कॅप त्याच्या डोक्यावरून निघाली आणि चेंडूवर जाऊन पडली. हा प्रकार मुद्दाम करण्यात आला नव्हता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या प्रकारात ५ पेनल्टी धावा मिळाल्या नाहीत.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथ