Join us  

PAK vs AFG : ५,२,१,१...! पाकिस्तानच्या गोलंदाजांची 'दहशत', अफगाणिस्तानचा फक्त ५९वर 'कार्यक्रम'

पहिल्या वन डे सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा दारूण पराभव केला.

By ओमकार संकपाळ | Published: August 22, 2023 9:20 PM

Open in App

पहिल्या वन डे सामन्यात पाकिस्ताननेअफगाणिस्तानचा दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कसाबसा २०० धावांचा आकडा गाठणारा पाकिस्तानी संघ गोलंदाजीच्या जोरावर वरचढ ठरला. वेगवान गोलंदाज हारिस रौफ, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या त्रिकुटाने अफगाणिस्तानची पळता भुई थोडी केली. पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी संघ केवळ ५९ धावांवर सर्वबाद झाला अन् पाकिस्तानने १४२ धावांनी मोठा विजय मिळवला. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बाबर आझमच्या संघाने ४७.१ षटकांत सर्वबाद २०१ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर इमाम-उल-हक वगळता एकाही पाकिस्तानी खेळाडूचा टिकाव लागला नाही. कर्णधार बाबर खातेही न उघडता तंबूत परतला. पाकिस्तानकडून इमामने सर्वाधिक (६१) धावा केल्या, तर शादाब खानला (३९) धावा करण्यात यश आलं. याव्यतिरिक्त बाबर आझम (०), फखर झमान (२), मोहम्मद रिझवान (२१), आगा सलमान (७), इफ्तिखार अहमद (३०), उसामा मीर (२), शाहीन आफ्रिदी (२), हारिस रौफ (१) आणि नसीम शाहने नाबाद (१८) धावा केल्या. 

अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कमाल करत पाकिस्तानी संघाला आपल्या जाळ्यात फसवलं. मुजीब उर रहमानने ३३ धावा देत सर्वाधिक (३) बळी घेतले, तर मोहम्मद नबी आणि राशिद खानने (२) बळी पटकावले. याशिवाय फजलहक फारूक आणि रहमत शाह जुर्माते यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आलं.

पाकिस्तानी गोलंदाजांची दहशत पाकिस्तानने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला घाम फुटला. हारिस रौफने निम्मा संघ तंबूत पाठवून यजमानांना मोठे धक्के दिले. पाकिस्तानकडून हारिसने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर शाहीन आफ्रिदीला (२) बळी घेण्यात यश आले. याशिवाय नसीम शाह (१) आणि शादाब खानने (१) बळी घेऊन अफगाणिस्तानला अवघ्या ५९ धावांवर सर्वबाद केले. अफगाणिस्तानने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ ५९ धावा केल्या. विशेष बाब म्हणजे यजमान संघातील एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने सर्वाधिक (१८) धावा केल्या, तर पाच फलंदाज खातेही न उघडता माघारी परतले. 

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमआंतरराष्ट्रीय क्रिकेटअफगाणिस्तान
Open in App