मेलबर्न : ‘कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविल्याचा आनंद आहे. मात्र आमची खरी परीक्षा भारताविरुद्ध असून टीम इंडियाला त्यांच्याच देशात नमविण्याचे आमचे अंतिम लक्ष्य आहे,’ असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केले आहे.
लँगर यांनी म्हटले, ‘विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाविरुद्धची लढाईच आयसीसी अव्वल स्थानासाठी खरी परीक्षा असेल.’ चेंडू छेडछाड प्रकरणानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या संकेतस्थळाशी संवाद साधताना लँगरने म्हटले की, ‘क्रमवारीत बदल होत राहणार याची आम्हाला कल्पना आहे. पण सध्या आम्ही या गोष्टीचा आनंद घेत आहोत. आमच्या अपेक्षेनुरुप संघ बनविण्यासाठी आम्हाला खूप काम करावे लागणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मैदानामध्ये आणि मैदानाबाहेर आमची कामगिरी चांगली राहिली.’
आपल्या संघाच्या लक्ष्याविषयी लँगर यांनी सांगितले की, ‘नक्कीच आमचे लक्ष्य जागतिक कसोटी अजिंक्यपद जेतेपद पटकावण्याचे आहे. मात्र अखेरीस आम्हाला भारताला त्यांच्याच भूमीमध्ये नमवावे लागेल आणि जेव्हा ते आॅस्टेÑलियामध्ये येतील तेव्हाही त्यांना पराभूत करावे लागेल.’ त्याचबरोबर अॅरोंच फिंचच्या नेतृत्वात आॅस्टेÑलिया टी२० विश्वचषकही उंचावेल, असा विश्वास लँगरने या वेळी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)