जोहान्सबर्ग : सर्वच खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आम्ही विजय मिळवू शकलो. हा एक उत्कृष्ट सांघिक विजय होता,’ अशी प्रतिक्रीया देत कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या पहिल्या टी२० सामन्यातील विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले.
सामन्यातील कामगिरीबाबत कोहली म्हणाला की, ‘या सामन्यासाठी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी होती. आघाडीच्या क्रमवारीत रोहित शर्मा आणि शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये होते. एकूणंच संघाची फलंदाजी शानदार ठरली. यानंतर भुवनेश्वरने आपल्या अनुभवाच्या जोरावर अर्धा संघ बाद केला. हा विजय पूर्णपणे सांघिक कामगिरीमुळे शक्य झाला.’
त्याचप्रमाणे, ‘अनेक काळापासून आम्ही टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात होतो. हे आमचे सर्वांत संतुलित प्रदर्शन होते. त्याचवेळी, अंतिम षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने शानदार गोलंदाजी केली आणि त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. आम्ही १६व्या षटकात २२० धावांचे लक्ष्य बाळगले होते. मात्र, धोनी बाद झाल्यानंतर धावांची गती कमी झाली. परंतु, शेवटी विजय मिळवण्यास काढलेल्या धावा पुरेशा ठरल्या,’ असेही कोहलीने यावेळी म्हटले.
फलंदाजांना सुधारणा करावी लागेल - ड्युमिनी
‘आमच्या संघातील वरिष्ठ खेळाडूंना आपल्या कामगिरीत सुधारणा करणे आवश्यक आहे,’ अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिका टी-२० संघाचा कर्णधार जेपी ड्युमिनीने दिली.
तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या लढतीत २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना ड्युमिनी म्हणाला, ‘दुर्दैवाने आमच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. खेळाडू व वरिष्ठ फलंदाज म्हणून आम्हाला ही जबाबदारी स्वीकारावा लागेल. आम्हाला आमच्या कामगिरीचे विश्लेषण करावे लागेल. बुधवारच्या लढतीत चांगली कामगिरी होईल, अशी आशा आहे.’ ड्युमिनी पुढे म्हणाला, ‘कारकिर्दीत बॅड पॅच येत असतो. दुर्दैवाने यावेळी मालिकेत अनेक खेळाडू बॅड पॅचमध्ये आहेत. त्यात माझाही समावेश आहे. एकदिवसीय मालिकेत निराशाजनक कामगिरीनंतर पहिल्या टी-२० मध्येही सूर गवसला नाही.’
ड्युमिनीने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांच्या भारतीय फलंदाजांविरुद्ध आखूड टप्प्याच्या मारा करण्याच्या रणनीतीचे समर्थन केले. पण, ही आमची रणनीती यशस्वी ठरली नाही, असेही तो म्हणाला.
ड्युमिनीने पाच बळी घेणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची प्रशंसा करताना म्हटले की, ‘त्याच्याकडून बरेच काही शिकता येईल. त्याने पहिल्या तीन विकेट स्लोव्हर वनवर काढल्या. तो प्रतिभावान गोलंदाज असून टी-२० क्रिकेटचा त्याला दांडगा अनुभव आहे.’