Join us  

U-19 World Cup 2018 : 'आमच्या संघावर कोणीतरी जादूटोणा केला होता', पराभवानंतर पाकिस्तान सैरभैर

सीमारेषेवर दिवसेंदिवस कुरापती करणा-या पाकिस्तानने आता क्रिकेटच्या मैदानावर देखील आश्चर्यकारक विधानं करण्यास सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 5:20 PM

Open in App

कराची : सीमारेषेवर दिवसेंदिवस कुरापती करणा-या पाकिस्तानने आता क्रिकेटच्या मैदानावर देखील आश्चर्यकारक विधानं करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी अंडर-19  वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानचा 203 धावनांनी दारूण पराभव केला. पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक नदीम खान यांनी एक वेगळंच वक्तव्य केलं आहे. ज्या पद्धतीने आमच्या संघाचा पराभव झाला ते पाहता आमच्या संघावर कोणीतरी जादूटोणा केला होता असं वाटतं असं विधान त्यांनी केलं आहे. 

उपांत्य फेरीत दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना होईल असा आम्हाला विश्वास होता. पण अवघ्या 69 धावांमध्येच आमचा संघ गारद झाला. टीमची ही स्थिती पाहून असं वाटतं की, कोणीतरी आमच्या खेळाडूंवर जादूटोणा केला आहे. दबावात कसा खेळ करावा आणि मैदानात काय होतंय याबाबत आमच्या फलंदाजांना काही कल्पनाच नव्हती असं वाटतं असंही ते पुढे म्हणाले. 

पाकिस्तानचा दारूण पराभव केल्यानंतर भारताच्या अंडर 19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने पाकिस्तानी खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली होती. द्रविडच्या या कृतीचं नदीम खान यांनी कौतुक केलं आहे.  द्रविडच्या या कृतीमुळे त्याच्याबाबतचा आमच्या मनातील सन्मान आणखी वाढला आहे, असं खान पुढे म्हणाले.   

अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं  तब्बल 203 धावांनी धुव्वा उडवला.  शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद शतक (102)आणि कर्णधार पृथ्वी शॉ (42) व मनज्योत कालरा (47) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान संघ मात्र अवघ्या 69 धावांतच गारद झाला. त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचाही भारतीय संघाने सहज पराभव केला आणि विश्वविजेतेपद पटकावलं.    

टॅग्स :19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाक्रिकेटपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ