सेंच्युरियन : द. आफ्रिकेविरुद्ध दुसºया टी-२० लढतीत १८८ धावाचे संरक्षण करण्यात आलेल्या अपयशासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याने पाऊस आणि खराब हवामानाला दोष दिला. अधूनमधून आलेल्या पावसामुळे गोलंदाजांना मारा करणे फारच कठीण झाले होते, असे तो म्हणाला.
युझवेंद्र चहल याला चेंडूवर ग्रीप मिळविणे कठीण होऊन बसल्याने त्याने चार षटकांत ६४ धावा दिल्या. यजमानांनी सहा गड्यांनी विजय नोंदवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. कोहली म्हणाला, ‘गोलंदाजांसाठी स्थिती कठीण होती. सुरुवातीला गडी गमविल्यानंतर मनीष पांडे, रैना आणि धोनी यांनी डाव सावरला. माझ्यामते १८८ धावा विजय मिळविण्यास पुरेशा होत्या पण पावसामुळे गणित बिघडले. १२ व्या षटकानंतर चेंडूवर ग्रीप मिळविणे कठीण होऊन बसले.’
पावसाबद्दल कोहली पुढे म्हणाला, ‘आमच्यावेळी खेळ सुरू राहिल्याने यजमानांच्या डावातही तो सुरूच राहील याचा अंदाज होता. पावसाची रिपरिप सुरू असताना खेळ शक्य होता. अशा स्थितीत ड्यूमिनी आणि क्लासेन यांनी विजय साकारला. विजयाचे श्रेय यजमान फलंदाजांना जाते.’
कर्णधार जेपी ड्यूमिनी याने विजय मिळवल्यानंतर सांघिक प्रयत्नांवर समाधान व्यक्त केले. डकवर्थ-लुईस नियम लक्षात ठेवूनच आम्ही लक्ष्याचा पाठलाग केल्याचे सांगून तो म्हणाला, ‘नाणेफेकीच्यावेळी मी विराट कोहलीला ही लढत उपांत्य फेरी असल्याचे म्हटले होते. त्यानुसारच गोलंदाजी सुरू केली. अखेरच्या पाच षटकांत भारतीय फलंदाज वरचढ ठरले असले, तरी आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. अखेर हा विजय सहजसोपा ठरला. पावसामुळे विजय कुणाकडेही झुकू शकला असता, पण आम्ही नियोजनानुसार खेळलो आणि विजयी झालो.’
‘हिटमॅन’चा गोल्डन डक
‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या झंझावाती फलंदाजीची भुरळ संपूर्ण क्रिकेटविश्वाला आहे. परंतु, द. आफ्रिका दौºयातील एक शतक सोडल्यास त्याला आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आलेली नाही. यामुळे त्याला सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच बुधवारी झालेल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसºया टी२० सामन्यात तो ‘गोल्डन डक’वर बाद झाला.रोहितला ज्यूनिअर डालाने खातंही खोलू दिलं नाही आणि पायचीत करत तंबूत परतवलं. रोहित फक्त एकच चेंडू खेळू शकला. या दौºयातील टी-20 मधील रोहित शमार्चा हा पहिला गोल्डन डक ठरला.
या गोल्डन डकमुळे रोहितच्या नावावर नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आह. भोपळाही न फोडता बाद होणाºया भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहितने ‘टॉप’ केले असून टी20मध्ये त्याने चार वेळा गोल्डन डक साधले आहेत.
या सामन्याधी रोहितसह आशिष नेहरा आणि अष्टपैलू युसूफ पठाण यांच्या नावावर प्रत्येकी ३ गोल्डन डक होते. मात्र आता रोहितने
आघाडी घेत अव्वल स्थान पटकावले आहे.
चहल महागडा गोलंदाज
सेंच्युरियन : टी-२० आंतरराष्टÑीय सामन्यात देशातर्फे सर्वश्रेष्ठ कामगिरी करणारा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने बुधवारी द. आफ्रिकेविरुद्ध सर्वात खराब कामगिरी केली.
चहलने चार षटकांत ६४ धावा मोजल्या. यासह तो सर्वात महागडा भारतीय गोलंदाज बनला आहे.
२००७ मध्ये डरबन येथे इंग्लंडविरुद्ध चार षटकांत ५७ धावा मोजणाºया जोगिंदर शर्माला चहलने मागे टाकले.
याआधी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा विक्रम चहलच्या नावे होता. त्याने इंग्लंडविरुद्ध बेंगळुरू येथे २५ धावांत सहा गडी बाद केले होते. चहलच्या गोलंदाजीवर बुधवारी सात षटकार लागले होते.
... आणि धोनी भडकला
क्रिकेट विश्वातील सर्वात शांत व संयमी खेळाडू म्हणून ओळखला जाणाºया महेंद्रसिंग धोनीचा तापट स्वभाव पाहून बुधवारी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय डावातील अखेरच्या षटकामध्ये मनिष पांड्येने मारलेल्या फटक्यावर धोनी दुसरी धाव घेण्याच्या तयारीत होता, पन त्यावेळी मनिषचे लक्ष क्षेत्ररक्षकाकडे असल्याने धोनीला दुसरी धाव घेता आली नाही. यामुळे भडकलेल्या धोनीच्या तोंडून रागाच्या भरात अपशब्द निघाले आणि त्याने मनिषला लक्षपूर्वक खेळण्याचे सुनावले. सध्या धोनीचा हा ‘तापट’ व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ड्यूमिनीने मोकळे खेळण्याची प्रेरणा दिली - क्लासेन
सेंच्युरियन : भारताविरुद्ध दुसºया वन डेत
३० चेंडूत ६९
धावा ठोकणाºया हेन्रिक क्लासेन याने या कामगिरीचे श्रेय कर्णधार ड्यूमिनीला दिले. त्याने मला नैसर्गिक फटके मारण्याची आणि गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याची प्रेरणा दिली. जेपीने मला एका षटकांत इतक्या धावा निघाव्यात असे टार्गेट देताच आतमधली भीती नष्ट झाल्यानंतर शांतचित्ताने उत्तुंग फटके मारू शकलो. यष्टिरक्षक- फलंदाज क्लासेनचे हे स्थानिक मैदान आहे. घरच्या मैदानावर विजयी खेळी करण्याचे माझे स्वप्न साकार झाल्याचे क्लासेनने सांगितले. भारतीय गोलंदाजीबाबत क्लासेन म्हणाला की, ‘भारतीय गोलंदाज खूप कौशल्यपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर धावा काढणे सोपे नसते.’ विशेष म्हणजे क्लासेनने घरच्या मैदानावर संघासाठी विजयी खेळी करत निर्णायक भूमिका बजावली. त्याने म्हटले की, ‘घरच्या मैदानावर संघासाठी विजयी खेळी करण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हा दुग्धशर्करा योग होता.’
मधल्या फळीत खेळू शकतो
- मनीष पांडे
संघात स्थान मिळविण्यासाठी प्रतीक्षा करीत मी अनेकदा विचलित झालो. पण संधी मिळताच स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाची मधली फळी भक्कम करू शकतो, हे सिद्ध केले. द. आफ्रिकेविरुद्ध दुसºया टी-२० त ४८ चेंडूत ७९ धावा ठोकणारा मनीष पांडे याने सामन्यानंतर ही प्रतिक्रिया दिली.
‘भारतीय संघात चढाओढ असल्याने संधीची प्रतीक्षा करताना थोडा विलंब होतो. यामुळे विचलित होण्याची भीती असते पण चौथ्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळताच चांगली कामगिरी करू शकतो. संघात सलगपणे स्थान मिळाल्यास नियमित निवडीसाठी योग्य कामगिरी करू शकतो, असा विश्वास असल्याचे पांडेने सांगितले. पांडे वन डे मालिकेत बाहेरच राहीला. केदार जाधव जखमी झाल्यानंतरही त्याच्याऐवजी श्रेयस अय्यर याला संधी देण्यात आली होती.
मला चहलची गोलंदाजी आवडते. त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्याचा मी आनंद घेतो. ज्यावेळी मी ज्यूनिअर स्तरावर होतो तेव्हा दोन लेग स्पिनरसह खेळलो आहे. सामन्यात अनेकदा तुमच्या मनासारखे फटके खेळले जातात. बुधवारीही असेच झाले. चहलवर हल्ला चढविण्याची आमची कोणतीही योजना नव्हती. मात्र, ज्याप्रकारे
भारतीय वेगवान गोलंदाजांनी मारा केला, ते पाहता मी चहलविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत संधी निर्माण केल्या. कारण त्याच्याविरुद्ध माझ्याकडे अनेक पर्याय होते.
- हेन्रिक क्लासेन
जेव्हा सामना सुरु झाला तेव्हा ही लढत पुर्ण खेळली जाईल याची आम्हाला जाणीव झाली. रिमझिम पावसानंतर चेंडूवर पकड मिळवणे कठीण बनले होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धोका पत्करताना फटकेबाजी केली आणि सर्वात लहान सीमारेषेवर त्यांनी हल्ला केला. यामध्ये ते यशस्वीही ठरले. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेचा या विजयावर हक्क होता. या संघाकडून आम्हाला कडव्या लढतीची अपेक्षा होती आणि त्यांनी या खेळानुसार तो जोश दाखवला.