गुवाहाटी : भारताने रविवारी वेस्ट इंडिजचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहज पराभव करत दणदणीत विजय मिळविला असला, तरी या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने केलेल्या वक्तव्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले गेले आहे. ‘आता क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी माझ्याकडे काही वर्षांचाच अवधी शिल्लक आहे,’ असे वक्तव्य करत कोहलीने सर्वांनाचा धक्का दिला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने १४० धावांची]खेळी अनेक विक्रम मागे टाकले. या झंझावाती खेळीच्या जोरावर तो ‘सामनावीर’ ठरला. यावेळी ‘कॅप्टन कोहली’ने धक्कादायक वक्तव्य केले. ‘क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी माझ्याकडे आता काही वर्षेच शिल्लक आहेत. देशासाठी खेळणे ही अत्युच्च सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट असून, हा खेळ फार गंभीरपणे न घेणे तुम्हाला परवडू शकत नाही. तुम्ही खेळाबद्दल प्रामाणिक असले पाहिजे आणि मी तसेच राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही भारतासाठी खेळताय आणि ही संधी सर्वांना मिळत नाही,’ अशी भावना विराटने व्यक्त केली. मात्र, काही वर्षेच उरली आहेत म्हणजे नेमके काय? यावरून क्रिकेटविश्वात तर्कवितर्कांना उधाण आले.
कोहलीने यंदा भारतीय खेळपट्टयांवरच नव्हे, तर परदेशातल्या उसळत्या खेळपट्ट्यांवरही तगडी फलंदाजी केली आहे. तो आला, खेळला व विक्रम रचला, असेच सध्या पाहायला मिळत आहे. विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने रोहित शर्मासह द्विशतकी भागीदारी रचताना ३६वे एकदिवसीय शतक झळकावताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनला ३६ एकदिवसीय शतके पूर्ण करण्यासाठी ३११ सामने खेळावे लागले होते, तर विराटने २०४ सामन्यांतच हा पराक्रम केला.
त्याचप्रमाणे, सलग दुसऱ्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा पल्ला पार करून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एका वर्षात २ हजार धावा करण्याचा पराक्रम पाच वेळा केला होता. विराटनेही हा ‘पंच’ मारला आहे. (वृत्तसंस्था)
>‘कोहलीच्या म्हणण्याचा टोकाचा अर्थ काढू नये’
कोहलीच्या या ‘विराट’ कामगिरीने चाहते खूश झाले असतानाच, त्याने काहीसा भैरवीचा सूर लावून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. ‘माझ्या कारकिर्दीत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी काही वर्षेच शिल्लक आहेत,’ या त्याच्या वाक्याने अनेकांना धक्का बसला आहे. अर्थात, वय, फॉर्म, स्टॅमिना, तंदुरुस्ती, नशीब या सगळ्याच गोष्टी विराटच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्याच्या म्हणण्याचा अगदीच टोकाचा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे क्रिकेटतज्ज्ञांनी म्हटले. विराट अजून बरेच विक्रम रचेल, असा विश्वासही जाणकारांनी व्यक्त केला, परंतु विराट अचानक असे का म्हणाला, अशी शंकेची पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकतेच आहे.