Join us  

एकदा दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, त्याच रमेश पोवारची पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती!

भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार ( Ramesh Powar ) याची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 3:05 PM

Open in App

भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार ( Ramesh Powar ) याची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागाक समितिनं ( CAC) डब्लू व्ही रमण ( WV Raman) यांना बदली म्हणून पोवारची निवड केली. मदन लाल व सुलक्षणा नाईक यांनी या पदासाठी ८ जाणांची मुलाखत घेतली. ४२ वर्षीय पोवार याआधी भारताच्या महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर होता, परंतु वन डे संघाची कर्णधार मिताली राज हिच्यासोबत त्याच भांडण झालं आणि त्यानंतर पोवार यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मितालीला बाकावर बसवल्यामुळे या वादाला सुरूवात झाली होती. भारताला इंग्लंडविरुद्धचा तो सामना गमवावा लागला. त्यानंतर टीम मिटींमधील इ मेलही लिक झाले होते. यात मिताली राजनं पोवारवर गंभीर आरोप केले होते. पोवार यांनीही त्याला उत्तर देताना, मिताली स्वार्थी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पोवारची उचलबांगडी झाली. पण, ट्वेंटी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व उप कर्णधार स्मृती मानधना यांनी पोवार यांना कायम राखावे, या आशयाचे पत्र बीसीसीआयला पाठवले होते.

त्यानंतर डब्लू वी रमण यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. आताही मिताली राज वन डे संघाची कर्णधार आहे, हरमनप्रीत ट्वेंटी-२० संघाची. ''समितीमधील सर्व सदस्यांना या पदासाठी पोवार हाच योग्य उमेदवार असल्याचे वाटले आणि एकमतानं त्याची निवड झाली, ''असे मदन लाल यांनी सांगितले. ते म्हणाले,''मिताली राजसोबत पुन्हा काम करण्याबाबतचं विचारत असाल, तर काही समस्या नसेल. मितालीचं काम तिच्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडण्याची आहे आणि तिनं ते काम करून संघाला पुढे न्यायला हवं.'' 

आगामी इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी संघाच्या कर्णधारपदावरही मितालीची निवड होण्याची शक्यता आहे. पोवार यांच्या मार्गदर्शनाखालील हा पहिलाच दौरा असेल. सात वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी मालिका खेळणार आहे.''भारतानं या दौऱ्यावर चांगली कामगिरी करावी, असे दोघांनाही वाटत असेल, तर त्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं आणि जिंकण्यासाठी खेळायला हवं. भारतीय महिला क्रिकेटला त्यांनी प्राधान्यक्रम द्यायला हवं,''असं डायना एडुल्जी यांनी सांगितले.    पोवारनं २ कसोटी व ३१ वन डे सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघानं सलग १४ ट्वेंटी-२० सामने जिंकले. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय