Join us  

२ चेंडूत ३ धावा करु शकले नाही, 'रन आऊट' झाला खेळाडू अन् दाऊदची मेहनत गेली वाया!

क्रिकेटमध्ये २ चेंडूत ३ धावा करणं ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. बहुतांश संघ अशा परिस्थितीत अतिशय सहजपणे लक्ष्य पूर्ण करताना आपण आजवर पाहिलेलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 8:12 PM

Open in App

क्रिकेटमध्ये २ चेंडूत ३ धावा करणं ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. बहुतांश संघ अशा परिस्थितीत अतिशय सहजपणे लक्ष्य पूर्ण करताना आपण आजवर पाहिलेलं आहे. पण ओमानच्या अल अमिरात क्रिकेट ग्राऊंडवर आज काही वेगळंच पाहायला मिळालं. ओमान विरुद्धच्या सामन्यात यूएईच्या संघाला शेवटच्या दोन चेंडूत तीन धावा करता आल्या नाहीत आणि सामना अनिर्णीत राहीला. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप लीग-२ मध्ये खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ओमानचा संघ २१४ धावांतच गारद झाला होता. प्रत्युत्तरात यूएईचा संघ सहज लक्ष्य गाठेल असं दिसत असतानाच शेवटच्या दोन चेंडूंमध्ये फासा पलटला. ओमानच्या खेळाडूंनी केलेली उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यूएई संघासाठी घातक ठरली. सामना अनिर्णीत राहिला. यूएईचा संघाचा डाव ५० षटकांत २१४ धावांमध्ये संपुष्टात आला. 

सामन्यात अखेरच्या षटकात यूएईला विजयासाठी ९ धावांची गरज होती. ओमानसाठी खवार अली गोलंदाजी करत होता. तर यूएईचे काशिफ दाऊद आणि जहूर खान क्रीझमध्ये फलंदाजीला होते. खवार अली यानं पहिल्या दोन चेंडूत दाऊदला धाव घेऊ दिली नाही. तिसऱ्या चेंडूवर दाऊदनं दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूवर दाऊदचं खणखणीत चौकार ठोकून सामन्यात रोमांच निर्माण केला. शेवटच्या दोन चेंडूत यूएईला जिंकण्यासाठी अवघ्या तीन धावांची गरज होती. काशिफ दाऊदचं अर्धशतक देखील पूर्ण झालं होतं. पाचव्या चेंडूवर खवाल अलीने दाऊदला शोएब खान करवी झेलबाद केलं आणि एकच गहजब उडाला. सामन्याला नवं वळण मिळालं. 

अखेरच्या चेंडूवर नवा फलंदाज अकीफ राजा स्ट्राइकवर होता. शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. खवाल अलीच्या चेंडूवर अकीफ राजा यानं फटका लगावला आणि दोन धावा काढण्यात यश प्राप्त केलं. पण तिसरी धाव घेत असताना तो रनआऊट झाला आणि सामना टाय झाला. ओमाननं लढवय्या कामगिरी करत सामन्याचं चित्रच पालटून टाकलं आणि यूएईला धक्का दिला. 

दाऊदनं यूएईला सामना जिंकून दिला नसला तरी त्याला सामनावीराच्या पुरस्कारनं गौरविण्यात आलं. काशिफ दाऊद यानं फलंदाजीसोबत गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्यानं ९.३ षटकांमध्ये ४१ धावा देत ३ विकेट्स मिळवल्या. तर फलंदाजीत दाऊदनं ५२ चेंडूत ५२ धावांचं योगदान दिलं. सामनावीराचा पुरस्कार मिळाला असला तरी संघाला विजय प्राप्त करुन देण्यात अपयशी ठरल्याची नाराजी दाऊदनं व्यक्त केली. 

टॅग्स :संयुक्त अरब अमिरातीबीसीसीआय
Open in App