तब्बल १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकच्या आयोजन समितीने क्रिकेट सामने आयोजित करण्यासाठी मैदानाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेमधील क्रिकेट सामने दक्षिण कॅलिफोर्नियातील पोमोना येथील फेअरग्राउंड्समध्ये खेळवले जातील, अशी माहिती ऑलिंपिक समितीने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.
लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिक स्पर्धा १४ ते ३० जुलैदरम्यान होणार आहे. तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करत आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील आणि सुवर्णपदकासाठी स्पर्धा करतील. या ६ संघांसाठी ९० खेळाडूंचा कोटा तयार करण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येकी क्रिकेट संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. ऑलिंपिक स्पर्धा जवळ येताच क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. नुकतीच ऑलिंपिकच्या आयोजन समितीने या स्पर्धेतील क्रिकेट सामने दक्षिण कॅलिफोर्नियातील पोमोना येथील फेअरग्राउंड्समध्ये खेळवले जातील, अशी घोषणा केली आहे. पोमोना हे ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापन १८८८ मध्ये झाली आहे.
जय शहांची प्रतिक्रियालॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी क्रिकेट स्थळाच्या घोषणेवर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लॉस एंजेलिस २०२८ मध्ये क्रिकेट स्थळाच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. क्रिकेटचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. क्रिकेट हा आधीच एक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ ऑलिंपिकमध्ये आल्याने त्याचा वारसा आणखी उंचावर जाईल. तसेच नवीन चाहते क्रिकेटशी जोडले जातील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ऑलिंपिकमध्ये सहा क्रिकेट संघाची निवड होणारऑलिंपिकसाठी सहा संघांची निवड कशी केली जाईल? हे अद्याप निश्चित झालेले नाही. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे हे १२ संघ आयसीसी पूर्ण सदस्य आहेत. आयसीसी क्रमवारीतील पहिल्या पाच संघाना थेट प्रवेश दिला जाऊ शकतो. तर, एक संघ यजमान अमेरिकेचा असू शकतो. याबाबत लवकरच ऑलिम्पिक समतीकडून स्पष्ट करण्यात येईल.