लंडन - आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ भेदक मारा करीत असलेल्या कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय लढतीच्या निमित्ताने ब्रिटन दौ-यात आणखी एक मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. भारताने गुरुवारी पहिला एकदिवसीय सामना जिंकण्यापूर्वी टी-२० मालिका जिंकलेली आहे.
टी-२० मालिकेत इंग्लंडने फिरकी गोलंदाजीची मशीन मर्लिनसह सराव केला होता, पण त्याचा त्यांना काही लाभ झालेला नाही. कुलदीपने पहिल्या वन-डेमध्ये २५ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. इंग्लंडच्या फलंदाजांना कुलदीपचा मारा खेळण्याची मानसिक तयारी करावी लागणार आहे. जो रुट सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत आहे. तो सलग तीन डावांमध्ये मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणाºया फिरकीपटूचा बळी ठरला आहे. अशा परिस्थितीमध्ये जोस बटलरला फलंदाजी क्रमामध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याने सहाव्या क्रमांकावर खेळताना अर्धशतकी खेळी केली आणि फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले.
टी-२० मालिकेत १-० ने पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडने हिरवळ असलेली खेळपट्टी तयार केली होती. त्यानंतरही वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळाला नव्हता. दुसºया एकदिवसीय सामन्यामध्ये खेळपट्टीवर हिरवळ राहील का, याबाबत उत्सुकता आहे. अॅलेक्स हेल्स स्नायूच्या दुखापतीमुळे मालिकेतून ‘आऊट’ झाला आहे. भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. भारताने वन-डे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली तर आयसीसी मानांकनामध्ये उभय संघांदरम्यान मानांकन गुणांचे अंतर कमी होईल.
२०१६ पासून विजयरथ
भारतीय संघाने जानेवारी २०१६ आॅस्ट्रेलिया दौ-यानंतर द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावलेली नाही. त्यानंतर सलग ९ मालिका जिंकल्या आहेत. त्यात २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी अशी एकमेव स्पर्धा आहे ज्यात भारत विजय मिळवू शकला नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल राहुल, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड : ईयोन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टा, जोस बटलर, मोईन अली, जो रुट, जॅक बाल, टॉम कुरेन, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशीद, डेविड विली, मार्क वुड.
स्थळ : लॉडर््स, वेळ : दुपारी ३.३० पासून