Join us  

विराट कोहलीकडून वन डे संघाचेही कर्णधारपद जाणार?; रोहित शर्मासोबत चर्चा करून BCCI निर्णय घेणार

भारतीय संघ या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 2:50 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वाची जबाबदारी सोडली अन् रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) अधिकृतपणे कर्णधारपद आलं. मर्यादित षटकांच्या संघांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार अशी क्वचितच घडणारी घटना टीम इंडियात होताना दिसत आहे. त्यामुळे आता विराटकडून वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी काढून ती रोहितकडे सोपवावी अशी चर्चा सुरू जाली आहे. पण, हा संवेदनशील विषय असल्याचे बीसीसीआयनं मान्य केलं असून विराट व रोहित या दोघांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असे BCCIने स्पष्ट केले.

भारतीय संघ या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे.  Times of Indiaनं दिलेल्या माहितीनुसार चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती वन डे कर्णधारपदाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी निवड समिती विराट व रोहित यांच्याशी चर्चा करतील. '' वन डे संघाचे कर्णधारपद हा संवेदनशील मुद्दा आहे. ट्वेंटी-२० संघापाठोपाठ रोहित शर्माकडे वन डे संघाचे नेतृत्व सोपवण्यात यावं, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, निवड समितीला विराटशी चर्चा करावी लागेल. त्याशिवाय रोहितसोबतही या भूमिकेबाबत बोलायला हवं,''असं निवड समितीच्या सूत्रानं TOIला सांगितले. भारतात २०२३ वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेपर्यंत विराटला कर्णधारपदावर कायम रहायचे आहे.   

भविष्यात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील - राहुल द्रविड'संघ निवडीबाबत संघ व्यवस्थापन भविष्यात काही कठोर निर्णय घेऊ शकेल,' असे सांगत खेळाडूंसह स्पष्ट चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं सांगितलं होतं. सलामीवीर रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती, तर कर्णधार कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या पहिल्या कसोटी मालिकेत श्रेयस अय्यर व मयांक अग्रवाल यांनी प्रत्येकी एक शतकी खेळी केली. यामुळे संघातील स्थान टिकवण्यासाठी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंवर दबाव आले आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर द्रविड म्हणाला की, 'युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत आणि यामुळे संघ निवड करताना चांगलीच कसोटी लागणार आहे. प्रत्येकजण चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असून, प्रत्येक जण एकमेकांसाठी कठीण आव्हान निर्माण करत आहे. मला आशा आहे की, यामुळे आमची परीक्षा होईल आणि यामुळे आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पण हे करत असताना खेळाडूंसोबत स्पष्ट संवाद असेल आणि असे निर्णय का घ्यावे लागले हे जेव्हा त्यांना समजावता येईल, तेव्हा काहीच अडचण होणार नाही.'

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माविराट कोहली
Open in App