Join us  

NZ vs IND, 2nd ODI: दुसरा एकदिवसीय सामना आज; भारतापुढे न्यूझीलंडला रोखण्याचे अवघड आव्हान

न्यूझीलंडने एकदिवसिय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करीत विजय साकार केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 2:39 AM

Open in App

ऑकलंड : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकांवर मात करून न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयपथावर परतण्याचे भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य असेल. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकणे अनिवार्य असल्याने भारताला आपला सर्वोत्तम खेळ करावाच लागेल. त्यासाठी यजमान संघाला रोखण्याचे अवघड काम विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला करावे लागणार आहे.

पाच सामन्यांची टी२० मालिका एकतर्फी जिंकल्यानंतर तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला चार गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडने एकदिवसिय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करीत विजय साकार केला. ईडन पार्कचे मैदान लहान असल्याने धावांचा पाठलाग करणाºया संघाला लाभ होतो. यजमानांनी पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजवले. दुसरीकडे कोहलीने जसप्रीत बुमराहवर सर्वाधिक विश्वास दाखवला होता. क्षेत्ररक्षणही ढिसाळ झाले. हे देखील पहिल्या सामन्यातील पराभवाचे कारण ठरले.

बांगलादेश विरुद्धच्या मालिकेपासूनच भारतीय क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालावला आहे. शुक्रवारी संघाने सराव केला. त्यावेळी नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी गोलंदाजीचा सराव केला. केदार जाधवच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहेत. निवडकर्त्यांनी संतुलनासाठी केदारला संघात ठेवले, मात्र कोहलीने त्याला एकही षटक टाकण्यास दिले नव्हते. मैदान लहान असल्याने शिवम दुबे किंवा मनीष पांडे यांच्यापैकी एकाला संधी देण्याचा कोहलीचा विचार असावा.

न्यूझीलंड संघ टी२० मालिका गमविल्यानंतर विजयी वाटेवर परतला आहे. टॉम लॅथम याने मधल्या फळीत उपयुक्त फलंदाजी केली. हेन्री निकोल्स चांगली कामगिरी करीत आहे, मात्र रॉस टेलरने स्वत:चा फॉर्म कायम राखायला हवा. कर्णधार केन विलियम्सन तंदुरुस्तीअभावी संघाबाहेर आहे. स्कॉट कुग्लेन आजारी असल्याने खेळू शकणार नाही. ईश सोढी याच्याऐवजी सहा फूट आठ इंच उंचीचा केली जेमिसन हा खेळू शकतो.

उभय संघ यातून निवडणार

भारत : विराट कोहली कर्णधार, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी.

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रॅन्डहोमे, जिमी नीशाम, स्कॉट कुगलेइजन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिशेल सेंटनर, हॅमिश बेनेट, ईश सोढी, टिम साऊदी, केली जेमिससन आणि मार्क चॅपमन.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीजसप्रित बुमराहरॉस टेलरभारत