वेलिंग्टन: पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा १० गडी राखून पराभव केला आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावापाठोपाठ दुसऱ्या डावातही हाराकिरी केली. दुसऱ्या डावात भारताला १९१ धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर अवघ्या ९ धावांचं आव्हान होतं. ते न्यूझीलंडनं अगदी सहज गाठलं आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गोलंदाजांचा भेदक मारा आणि त्यांना फलंदाजांनी दिलेली साथ हे न्यूझीलंडच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.
न्यूझीलंडनं काल पहिल्या डावात ३४८ धावा केल्या. त्यामुळे त्यांच्याकडे १८३ धावांची भक्कम आघाडी होती. यानंतर भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. मयांक अगरवालनं अर्धशतक झळकावलं. मात्र कर्णधार विराट कोहलीसह भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी नाबाद होते. यावेळी भारताच्या ४ बाद १४४ धावा झाल्या होत्या. भारतीय संघ त्यावेळी ३९ धावांनी मागे होता.
चौथ्या दिवशी रहाणे आणि विहारी चांगली झुंज देतील अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. हे दोन्ही फलंदाज त्यांच्या वैयक्तिक धावसंख्येत प्रत्येकी चार धावांची भर घालून माघारी परतले. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच अवघ्या ७९ मिनिटांमध्ये भारताचे सहा फलंदाज तंबूत परतले. त्यांनी कालच्या धावसंख्येत केवळ ४७ धावांची भर घातली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं ५, तर ट्रेंट बोल्टनं ४ गडी बाद केले.
पहिल्या डावात १८३ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात १९१ धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी अवघ्या ९ धावा करायच्या होत्या. केवळ १० चेंडूत न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी ९ धावा केल्या आणि सामना खिशात घातला. न्यूझीलंडच्या टीम साऊदीला गोलंदाजीतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यानं पहिल्या डावात ४९ धावांत ४, तर दुसऱ्या डावात ६१ धावांत ५ फलंदाजांना माघारी धाडलं.