वेलिंग्टन : कसोटी फलंदाजीतील दोन मजबूत आधारस्तंभ असलेले विराट कोहली व चेतेश्वर पुजारा सलग दुसºया डावात अपयशी ठरल्याने भारत रविवारी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत बॅकफूटवर गेला आहे. पहिल्या डावात १८३ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने तिसºया दिवसअखेर दुसºया डावात ४ बाद १४४ धावांची मजल मारली. भारत अजूनही ३९ धावांनी मागे आहे. भारताची भिस्त आता अजिंक्य रहाणे (६७ चेंडू नाबाद २५) व हनुमा विहारी (७० चेंडू नाबाद ११) यांच्यावर आहे.
त्याआधी, न्यूझीलंडने तळाच्या फलंदाजांच्या जोरावर पहिल्या डावात ३४८ धावांची मजल मारली. सकाळच्या सत्रात न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना झुंजवले, तर दुसºया व तिसºया सत्रात ट्रेंट बोल्टने (३/२७) भारताला धक्के दिले. पुजाराने (८१ चेंडूंत ११ धावा) अत्यंत बचावात्मक पवित्रा घेतला. चहापानाच्या विश्रांतीपूर्वी अखेरच्या चेंडूवर पुजारा बाद झाला. कोहलीने ४३ चेंडूंमध्ये १९ धावांची खेळी केली. बोल्टच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्नात त्याने यष्टिरक्षक वॉटलिंगकडे झेल दिला.
सलामीवीर मयांक अगरवालने (९९ चेंडू, ५८ धावा) अर्धशतकी खेळी केली, पण त्याचा सहकारी पृथ्वी शाच्यॉ (३० चेंडू, १४ धावा) तंत्रातील उणिवा पुन्हा चव्हाट्यावर आला. त्याने बोल्टच्या गोलंदाजीवर शॉर्ट स्क्वेअर लेगला लॅथमकडे झेल दिला. अगरवालने सकारात्मक फलंदाजी केली. त्याने टीम साऊदीच्या (१-४१) गोलंदाजीवर झेलबाद होण्यापूर्वी ७ चौकार व एक षटकार लगावला. कोहलीने सांगितल्यानंतर अगरवालने डीआरएसची मागणी केली, पण स्निकोमीटरमध्ये चेंडू त्याच्या बॅटला चाटून गेल्याचे स्पष्ट झाले. न्यूझीलंडने पुजारा व विहारीविरुद्ध रिव्ह्यू गमावले. रहाणे व विहारी यांनी अखेरच्या सत्रात सावध फलंदाजी करत ३१ धावांची भागीदारी केली आहे. (वृत्तसंस्था)
महत्त्वाचे
टिम साऊदी न्यूझीलंडमध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून ३०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याने माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीला (२९९) मागे टाकले.
वेलिग्टन येथेच २००३ साली न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध १७० धावांची आघाडी घेतल्यानंतरही सामना गमावला होता. १५० हून अधिक धावांची आघाडी असतानाही गमावलेला न्यूझीलंडचा हा एकमेव सामना आहे.
जसप्रीत बुमराहने तब्बल ४८.५ षटके गोलंदाजी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला बळी मिळवला. याआधी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यात टिम साऊदीला बाद केले होते.
विराट कोहलीने सर्वाधिक कसोटी धावा काढणाºया भारतीय फलंदाजांमध्ये सहावे स्थान मिळवताना सौरव गांगुलीला मागे टाकले. कोहलीच्या खात्यात ७,२२३ धावा झाल्या असून गांगुलीने ७,२१२ धावा केल्या आहेत.
ईशांत शर्माने अकराव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये अर्धा संघ बाद केला.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि आॅस्टेÑलिया या ‘सेना’ देशांमध्ये ईशांत शर्मा सर्वाधिक बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज ठरला. ईशांतच्या नावावर १२१ बळी असून त्याने झहीर खान (१२०) आणि कपिलदेव (११७) यांना मागे टाकले.
पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे न्यूझीलंड संघ १७५ पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळविण्यात यशस्वी ठरला. भारतातर्फे ईशांत शर्माने ६८ धावांत ५ बळी घेतले. रविचंद्रन अश्विन (३/९९) याने सकाळच्या सत्रात दोन बळी घेतले, पण काईल जेमीसन व बोल्टसह तळाच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर धावा वसूल केल्या.
जेमीसनच्या ४५ चेंडूंतील ४४ धावांच्या खेळीमध्ये चार षटकारांचा समावेश आहे. त्याने कोलिन डी ग्रँडहोम (७४ चेंडू, ४३ धावा) याच्यासोबत आठव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. बोल्टने २४ चेंडूंना सामोरा जाताना ३८ धावा केल्या.
बुमराह व ईशांतने केली चांगली सुरुवात
भारताने दिवसाची सुरुवात चांगली केली. जसप्रीत बुमराहने (१/८८) सकाळच्या सत्रात पहिल्याच चेंडूवर वॉटलिंगला (१४) बाद केले. साऊदीचा (६) अडथळा ईशांतने दूर केला. त्यानंतर ग्रँडहोम, जेमीसन व बोल्ट यांनी न्यूझीलंडला मोठी आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ईशांतने बोल्टला बाद करीत आपल्या कारकिर्दीत ११ व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली.
तीनवेळा केले यशस्वी पुनरागमन
भारतीय संघाने कसोटी सामन्यांमध्ये १०० हून अधिक धावांची पिछाडी असताना केवळ तीन वेळाच विजय मिळवला आहे. १९७६ साली पोर्ट ऑफ स्पेन यथे झालेल्या सामन्यात १३१ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने ६ गड्यांनी विजय मिळवला होता. १९८०-८१मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८२ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने ५९ धावांनी बाजी मारली होती. २००१ साली कोलकाता येथे झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात भारतीय संघाला २७४ धावांनी पिछाडीवर पडून फॉलोआॅनचा सामना करावा लागला होता. मात्र तरीही व्हीव्हीएस लक्ष्मण-राहुल द्रविड यांच्या ऐतिहासिक भागीदारीच्या जोरावर भारताने १७१ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला होता.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव : ६८.१ षटकांत सर्वबाद १६५ धावा.
न्यूझीलंड (पहिला डाव) : १००.२ षटकांत सर्वबाद ३४८ धावा (केन विलियम्सन ८९, कायल जेमिसन ४४, रॉस टेलर ४४, ग्रँडहोम ४३; ईशांत शर्मा ५/६८, आर. अश्विन ३/९९).
भारत (दुसरा डाव) : ६५ षटकांत ४ बाद १४४ धावा (मयांक अगरवाल ५८, अजिंक्य रहाणे खेळत आहे २५, हनुमा विहारी खेळत आहे १५; टेÑंट बोल्ट ३/२७.)