Join us

इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात पुन्हा रंगला 'सुपर ओव्हर'चा थरार; पाहा कोणी केला विजयी प्रहार

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ओव्हरचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 16:26 IST

Open in App

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ओव्हरचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेतील पाचवा व अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. सामन्यात 2-1 अशा आघाडीवर असलेल्या न्यूझीलंडला चौथ्या सामन्यात पराभवाची चव चाखवून इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामनाही याच दोन संघांमध्ये झालेला आणि त्यात सुपर ओव्हरमध्येही निकाल लागला नव्हता. केवळ चौकार अधिक म्हणून इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. पण, यंदा निकाल लागला...

प्रमथ फलंदाजी करताना न्यूझीलंडनं 11 षटकांत 5 बाद 146 धावा केल्या. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांच्या दमदार सुरुवातीनंतर किवींनी मोठी धावसंख्या उभारली. गुप्तीलनं 20 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 50 धावा केल्या, तर मुन्रोनं 21 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 46 धावा चोपल्या. टीम सेइफर्टनं 16 चेंडूंत 1 चौकार व 5 षटकार खेचून 39 धावा करताना संघाला 146 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. जॉनी बेअरस्टोनं 18 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकार खेचून 47 धावा केल्या. पण, अन्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना ख्रिस जॉर्डननं अखेरच्या तीन चेंडूंत 12 धावा करून सामना बरोबरीत सोडवला. जिमी निशॅमच्या अखेच्या चेंडूवर जॉर्डननं चौकार खेचला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये इयॉन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टो यांनी 17 धावा चोपल्या. न्यूझीलंडला 1 बाद 8 धावाच करता आल्या आणि यावेळीही इंग्लंडनं बाजी मारली. 

 

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंड