Glenn Phillips cacth Video, NZ vs ENG : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीचा दोन दिवसांचा खेळ संपला असून इंग्लंडकडे २९ धावांची आघाडी आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३४८ धावा केल्या. केन विल्यमसनने ९३ धावांची दमदार खेळी केली. त्याला ग्लेन फिलिप्सने नाबाद ५८ धावा करून चांगली साथ दिली. पण त्याच्या खेळी पेक्षाही त्याने घेतलेल्या कॅचची जास्त चर्चा रंगली.
न्यूझीलंडच्या डावानंतर इंग्लंडने फलंदाजीची सुरुवात केली. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत ५ बाद ३१९ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडचे पहिले चार बळी झटपट गेले. त्यानंतर शतकवीर हॅरी ब्रूक आणि अर्धशतकवीर ओली पोप यांच्यात भागीदारी झाली. पण ग्लेन फिलिप्सच्या अफलातून कॅचने ही भागीदारी फुटली.
पाहा VIDEO -
सलामीवीर जॅक क्रॉली शून्यावर बाद झाला. जो रूट देखील शून्यावर बाज झाला. जेकब बेथेल १० धावांवर बाद झाला. बेन डकेटने ४६ धावांची झुंजार खेळी केली. पण वरची फळी गडगडल्याने इंग्लंडची अवस्था ४ बाद ७१ झाली होती. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि ओली पोप या दोघांनी दीडशे धावांची भागीदारी केली. ओली पोप ७७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत तळ ठोकला. हॅरी ब्रूक नाबाद १३२ धावांवर तर बेन स्टोक्स नाबाद ३७ धावांवर खेळत आहे.