रचिन रविंद्रची शतकी खेळी आणि टॉम लॅथमच्या अर्धशकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं रावळपिंडीचं मैदान मारलं आहे. टॉस जिंकून मिचेल सँटनरन बांगलादेशच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी करण्यास निमंत्रित केले होते. बांगलादेशच्या संघानं कर्णधार शांतोच्या शानदार ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ९ बाद २३६ धावा करत न्यूझीलंडसमोर २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडच्या संघानं पाच विकेट्स राखून हे आव्हान सहज पार केले. न्यूझीलंडच्या विजयासह बांगलादेशचा यंदाच्या हंगामातील प्रवास इथंच थांबला आहे. एवढेच नाही तर यजमान पाकिस्तानही स्पर्धेबाहेर पडला आहे. दुसरीकडे भारत-न्यूझीलंड यांचे सेमीच तिकीट पक्के झाले. आता 'अ' गटात या दोन्ही संघात टॉपर कोण? यासाठी लढाई रंगल्याचे पाहायला मिळेल.
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची खराब सुरुवात
बांगलादेशच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. विल यंगच्या रुपात तस्कीन अहमदनं किवींना पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याला खातेही उघडू दिले नाही. संघाच्या धावफलकावर १५ धावा असताना केन विलियम्सन ४ चेंडूत ५ धावा करून तंबूत परतला. डेवॉन कॉन्वेनं चांगली सुरुवात केली. पण मोठी खेळी करण्यात तोही कमी पडला. ४५ चेंडूत ३० धावांवर त्याने विकेट गमावली. न्यूझीलंडच्या संघानं ७२ धावांवर आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते.
रचिन रविंद्र टॉम लॅथमच्या शतकी भागीदारीनं सेट झाला सामना
पहिल्या तीन विकेट्स अगदी स्वस्तात गमावल्यावर रचिन रविंद्र आणि विकेट किपर बॅटर टॉम लॅथम ही जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची दमदार भागीदारी रचली. शतकी खेळीसह संघाच्या धावफलकावर द्विशतकी धावसंख्या लागल्यावर रचिन रविंद्र बाद झाला. त्याने १०५ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११२ धावांची खेळी केली.