माऊंट मोनगानुई : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंडचा ६ गड्यांनी पराभव करीत सलग २२वा सामना जिंकत रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील आपल्याच देशाच्या पुरुष संघाचा २००३ मध्ये नोंदवलेला सलग सर्वाधिक वन-डे आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेगलेनिंगने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू मेगान शूटच्या चार बळींच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव २१२ धावांत गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाने त्यानंतर एलिसा हिली (६५), एलिस पॅरी (नाबाद ५६) व एशलेग गार्डनर (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ६९ चेंडू राखून ६ गड्यांनी विजय मिळवला. विद्यमान विश्वचॅम्पियन संघाने सलग २२वा विजय नोंदविताना पॉन्टिंगच्या २००३च्या संघाचा सलग २१ विजय मिळविण्याचा विक्रम मोडला.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना मेगलेनिंग म्हणाली, ‘या संघाची ही शानदार उपलब्धी आहे. आम्ही हे विजय तीन वर्षांत मिळविले आहेत. त्यावरून आमच्या संघाने कामगिरीत किती सातत्य राखले, हे सिद्ध होते.’ ऑस्ट्रेलिया महिला संघाने ऑक्टोबर २०१७ पासून एकही वन-डे आंतरराष्ट्रीय सामना गमावलेला नाही. (वृत्तसंस्था)