Join us

आयपीएलमध्ये 'अनकॅप्ड' खेळाडूंची संख्या वाढणार! सुधारित नियमांना मंजुरी मिळण्याची शक्यता

मेगा लिलाव दर पाच वर्षांनी होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 08:58 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बहुप्रतीक्षित बैठकीमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रेंचाइजी प्रमुखांसह मेगा लिलावापूर्वी रिटेंशन कायम ठेवण्याबाबत वानखेडे स्टेडियम संकुलातील बोर्डाच्या मुख्यालयात बुधवारी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले) खेळाडूंची संख्या वाढविण्यावरही जोर देण्यात आल्याची माहिती मिळाली.

या बैठकीत रिटेंशनची संख्या ५ ते ६ असावी, मेगा लिलाव दर पाच वर्षांनी व्हावा, पर्समध्ये वाढ करण्यात यावी, खेळाडूंना कामगिरीवर आधारित वाढ तसेच अनकॅप्ड खेळाडूंच्या संख्येत वाढ करण्यात यावी, यावर मत मागविण्यात आले. माहितीनुसार, फ्रेंचाइजींना किमान दोन अनकॅप्ड खेळाडू वेगळ्या स्लॉटमध्ये ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. अनेक संघांनी गेली दोन तीन वर्षे अनकॅप्ड खेळाडूंवर मेहनत घेतल्याने त्यांना ते गमावू इच्छित नाही.

मुंबईने नेहल वढेरा, नमन धीर व आकाश मधवाल यांच्यावर मेहनत घेतली आहे. कोलकाताकडे वैभव अरोरा, रमणदीप सिंग व सुयश शर्मा आहेत. पंजाबकडे हरप्रीत ब्रार, आशुतोष शर्मा, शशांक सिंग व प्रभसिमरन सिंग आहेत. चेन्नईकडे मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग व समीर रिझवी तर हैदराबाद संघात नितीशकुमार रेड्डी, अब्दुल समद, बंगळुरूकडे यश दयाल, विजयकुमार विशाक, अनुज रावत व महिपाल लोमरोर आणि लखनोंकडे मयंक यादव व मोहसीन खान असे गुणवान 'अनकॅप्ड' खेळाडू आहेत.

असे असू शकतात सुधारित नियम...

फ्रेंचाइजींना ५ किंवा ६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळू शकते. संघांना 'अनकॅप्ड' खेळाडूंना अतिरिक्त स्लॉटमध्ये ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. इम्पॅक्ट खेळाडू नियम कायम राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघासाठी एक आरटीएम (राइट टू मॅच) उपलब्ध असू शकतो. फ्रेंचाइजींच्या पर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मेगा लिलाव दर पाच वर्षांनी होऊ शकतो.

 

टॅग्स :आयपीएल २०२४