नवी दिल्ली : ‘२०२२ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ३९ वर्षांची होणार आहे. वाढत्या वयानंतरही मी विश्वचषक खेळण्याची इच्छा सोडणार नाही. प्रत्येक मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर विश्वचषकात सहभागी होणार,’ असल्याचा विश्वास वन डेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा मान मिळवणारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने व्यक्त केला आहे.
न्यूझीलंडमध्ये २०२१ ला महिला विश्वचषकाचे आयोजन होणार होते, मात्र ते २०२२ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आले. त्यामुळे झूलन आणि मिताली राज या अनुभवी खेळाडूंची विश्वचषक खेळून निवृत्त होण्याची प्रतीक्षा लांबली आहे. आयसीसीच्या घोषणेनंतर मितालीने टष्ट्वीट करीत वर्षभराच्या उशिरामुळे आमच्या संघाची तयारी आणखी चांगली होईल, आणि पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज होऊ, असे म्हटले होते. झुलन सध्या ३७ वर्षांची आहे. ती म्हणाली, ‘आमच्याकडे तयारीसाठी १८ महिने आहेत. दुसरीकडे विश्वचषक निर्धारित कालावधीत झाला असता तर प्रतीक्षा करावी लागली नसती. मागच्या सहा महिन्यांपासून क्रिकेट खेळले नसल्यामुळे आता प्रत्येक मालिकेत कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य आखावे लागणार आहे. त्यानंतरच विश्वचषकाचा विचार करावा लागेल.’ (वृत्तसंस्था)