Join us

आता दक्षिण आफ्रिकेला मदत करणार अकरा हजार धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू

भारतामध्ये या क्रिकेटपटूचे चांगलेच नाव आहे. भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने अकरा हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 18:16 IST

Open in App

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एक भारतातील खेळाडू मदत करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना तो भारतीय खेळपट्ट्यांवर कसे खेळायचे, याचे धडे देणार आहे.

भारतामध्ये या क्रिकेटपटूचे चांगलेच नाव आहे. भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने अकरा हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. एक दर्जेदार फलंदाज म्हणून त्याने लौकिक मिळवला असला तरी त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण तरीही भारतीय क्रिकेट वर्तुळामध्ये त्याने चांगले नाव कमावले होते. आता तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे.

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या शाळेमध्ये हा खेळाडू होता. त्याचबरोबर मुंबईच्या संघातून तो सचिन बरोबर खेळला आहे. आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी तो ओळखला जायचा. या खेळाडूचे नाव आहे अमोल मुझुमदार.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अमोलची निवड केली आहे. या निवडीबाबत अमोल म्हणाला की, " गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने माझ्यापुढे हा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर मी होकार कळवला. दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवणे, हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. भारताविरुद्ध त्यांच्याच मातीत खेळणे, मोठे आव्हान असते. पण या आव्हानाला तोंड द्यायला मी सज्ज आहे."

टॅग्स :सचिन तेंडुलकरद. आफ्रिका