Join us  

आता चौथ्या क्रमांकाची उत्सुकता

थेट लंडनहून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 6:21 AM

Open in App

अयाझ मेमनडाव्या हाताचा अंगठा दुखावल्यानंतर किमान तीन आठवडे शिखर धवन क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ॠषभ पंतला राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. धवनची दुखापत पूर्ण बरी होण्याबाबत नक्की किती वेळ लागेल, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, धवनला दुखापतीतून सावरण्यास दोन आठवडे किंवा त्याहूनही अधिक वेळ लागेल. शिवाय अशा दुखापतीतून लवकरात लवकर ठीक होणे हे त्या व्यक्तीवरही अवलंबून असते. त्यामुळेच सध्या प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही,’ अशी माहिती भारतीय संघातील एका सदस्याने दिली आहे. भारतीय संघाला आता धवनच्या अनुपस्थितीमध्ये काही सामने खेळावे लागतील हे नक्की. त्याचवेळी दुसरीकडे आॅस्टेÑलियालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत असून त्यांनी दुखापतग्रस्त मार्कस स्टोइनिसच्या जागी मिशेल मार्शला संघात बोलाविले आहे.कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्याची क्षमता राखून असल्याने पंतला संघात बोलाविण्यात आलेले नाही. पण तोही धवनप्रमाणेच डावखुरा फलंदाज आहे. संघात उजवा-डावखुरा फलंदाजांच्या समावेशाने प्रतिस्पर्धी गोलंदाजीची लय काही प्रमाणात बिघडवता येते. पण तरी विजय मिळविण्यासाठी हा ठोस पर्याय नसेल. जेव्हा भारताने १९८३ साली ऐतिहासिक विश्वचषक जिंकला होता, तेव्हा संघात केवळ वेगवान गोलंदाज सुनील वॉल्सन हाच डावखुरा फलंदाज होता; आणि त्याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता सलामीला लोकेश राहुल खेळणार हे जवळपास निश्चित असताना चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, हाच प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. संघ निवडीच्या वेळी मुख्य निवडकर्ते एम.एस.के. प्रसाद यांनी विजय शंकर याला ‘थ्रीडी क्रिकेटर’ अशी उपमा देताना चौथ्या स्थानासाठी उपयुक्त खेळाडू ठरविले होते.( लेखक लोकमत वृत्तसमुहात सल्लागार संपादक आहेत )

चौथ्या स्थानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरहर्षा भोगले लिहितात...विश्वचषकात पावसाची कहाणी घरी आलेल्या नम्र पाहुण्यासारखी आहे. असा पाहुणा ओझेही वाटत नाही आणि सांभाळणेही कठीण जाते, तसेच पावसाचे झाले आहे. सोबत बोचरी थंडी आहे, त्यामुळे सामने पॉवर प्ले किंवा नेट रनरेट अथवा संघाच्या तुलनेवर विसंबून राहिलेले नाही. भारतासाठी चौथ्या स्थानाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. लोकेश राहुलने ही जबाबदारी सांभाळली होती. पण त्याला पुन्हा सलामीला खेळावे लागेल. पॉवर प्लेमध्ये धैर्याने तोंड देत डाव सावरण्याची गरज असते. या स्पर्धेत याचा प्रत्यय आला.अलीकडे राहुल फार चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा आलेली संधी स्वीकारून सोने करण्याची वेळ आली. पण त्याने प्रत्येक चेंडू टोलविण्यापासून सावध राहायला हवे. ही मोठी स्पर्धा असल्याने १५ खेळाडूंचा योग्य वापर करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर आहे. अशावेळी बेंचवर बसलेल्यांनी जबाबदारी स्वीकारावी. याबाबतीत भारतीय संघाने प्रत्येक खेळाडूचा बॅकअप लक्षात घेत संघ निवडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पावसाचा फटका बसू नये, अशी टीम इंडियाची इच्छा आहे. संघ तुल्यबळ असून न्यूझीलंडला नमविण्याचीही ताकद आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने आतापर्यंतचे सामने जिंकले असून, त्यांच्यापुढे भारताच्या रूपात पहिले मोठे आव्हान असेल.प्रत्येक सामन्यासाठी एक राखीव दिवस असावा का? हा प्रस्ताव देणे सोपे आहे, पण लागू करणे अत्यंत कठीण आहे. एखादा शेतकरी असेल तर तो दुष्काळ व वादळाशी मैत्री करणार नाही. त्याच्यासाठी अन्न पिकविणे महत्त्वाचे ठरते. क्रिकेटपटूंनीही त्यांच्यापुढे आलेली परिस्थिती स्वीकारून दमदार कामगिरी करणे आवश्यक असते. (टीसीएम)

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघविराट कोहली